माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू
राजभवनात शस्त्रवाटपाच्या आरोपांवर बरसले राज्यपाल
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबद्दल संताप व्यक्त केला. राजभवनात शस्त्रांचे वाटप केले जात असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला होता. हा आरोप आधारहीन असून तृणमूल खासदाराने माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्यपाल बोस यांनी दिला आहे.
जे आरोप करण्यात आले आहेत, त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. सत्तारुढ पक्षाचा खासदारच राजभवनात शस्त्रांचा साठा असल्याचे म्हणत असेल, तर याचा अर्थ राज्याच्या पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही असा होतो. या आरोपामागे अंतर्गत राजकारण आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. राजभवनात शस्त्रांचा शोध घेतला जाऊ शकतो. राजभवन लोकांसाठी खुले आहे, पहाटे 5 वाजल्यापासून सर्वसामान्य लोक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी राजभवनात येऊन शस्त्रास्त्रs आहेत की नाहीत हे पाहू शकतात असे राज्यपाल बोस यांनी म्हटले आहे.
तृणमूल खासदाराचा गंभीर आरोप
राज्यपाल बोस हे भाजपच्या गुन्हेगारांना राजभवनात बोलावून शस्त्रास्त्रs देत आहेत. बंगालच्या राज्यपालांनी भाजपच्या गुन्हेगारांना राजभवनात बोलाविणे थांबवावे. तृणमूल कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यासाठी भाजपच्या गुन्हेगारांना राजभवनात शस्त्रास्त्रs पुरविली जात आहेत. बोस जोपर्यंत राज्यपाल आहेत, तोपर्यंत बंगालसोबत काहीच चांगले घडू शकत नाही असा आरोप तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला होता.