For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएमसी भाजी मार्केट पुन्हा गजबजले

12:27 PM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
एपीएमसी भाजी मार्केट पुन्हा गजबजले
Advertisement

शेतकऱ्यांतून आनंदाचे वातावरण : मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी, खरेदीदारांची वर्दळ

Advertisement

वार्ताहर /अगसगे

तब्बल तीन वर्षे आठ महिन्यांच्या वनवासानंतर बुधवार दि. 17 रोजी बेळगाव एपीएमसी भाजी मार्केट पुन्हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गजबजले. त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शेतकरी व्यापारी व खरेदीदारांची वर्दळ सुरू झाली आहे. किल्ला येथील भाजी मार्केटचे स्थलांतर बेळगाव एपीएमसीमध्ये दि. 16 मे 2019 रोजी केले होते. त्यानंतर एपीएमसी भाजी मार्केटला सुरुवात झाली व्यापाऱ्यांनी येथे कोटी रुपये गुंतविले होते मात्र, दोन वर्षे कोरोनामुळे त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यानंतर दि. 3 जानेवारी 2022 रोजी गांधीनगर येथे खासगी जय किसान भाजी मार्केटची सुरुवात झाली. त्यामुळे एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. बेकायदेशीर उभारलेल्या जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना कृषी पणन संचालकांनी रद्द केला. तसेच बुडा आयुक्तांनी लँड युज बदल रद्द केला होता. त्यामुळे बुधवारपासून जय किसान भाजी मार्केटचे स्थलांतर एपीएमसीमध्ये करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला होता त्यानुसार तीन वर्षे  बंद असलेले एपीएमसी भाजी मार्केट बुधवारी पहाटेपासून शेतकरी, व्यापारी, खरेदीदार व कर्मचाऱ्यांमुळे गजबजले होते.

Advertisement

जय किसानचे व्यापारी आले नाहीत

जय किसान भाजी मार्केटमध्ये व्यापार करणारे व्यापारी बुधवारी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आलेच नाहीत. यापूर्वीच्या व्यापाऱ्यांनी भाजी मार्केटमध्ये व्यापार केला. यावेळी 90 टक्के भाजीपाल्याची खरेदी-विक्री झाली असून बेळगाव परिसरातील खरेदीदार आले होते. मात्र गोव्यासह इतर मोठमोठ्या खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे. त्यांनीही या ठिकाणी येऊन भाजी खरेदी करावी व व्यापाराला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय किसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांतून नाराजी

खासगी जय किसान भाजी मार्केट उभारण्यासाठी परवाना शासनानेच दिला होता त्यानुसार गांधीनगर येथे भाजी मार्केट उभारण्यात आले. त्या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी कोठ्यावधी रुपये गुंतवणूक करून धंदा बसविला होता. मात्र आता यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाचे काय? त्याचाही शासनाने विचार केला पाहिजे, अशी चर्चा सुरू असून व्यापाऱ्यांतून नाराजी होत आहे. एपीएमसीमध्ये अद्याप 154 दुकाने शिल्लक असून जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी वर्गाने एपीएमसीमध्ये आल्यास त्यांना दुकानगाळे उपलब्ध करून देऊ, असे आवाहन बेळगाव जिल्हा भाजी व्यापारी संघाचे संचालक सतीश पाटील यांनी केले आहे.

130 कोटींचे एपीएमसी मार्केट

एपीएमसी आवारामध्ये सुमारे 23 एकर जागेत 130 कोटी खर्च करून सुसज्ज भाजी मार्केट उभारले आहे. येथे पार्किंग, दुकाने, हॉटेल व दोन शीतगृहे बांधण्यात आली आहेत तर आणखी एक शीतगृह सुमारे दहा कोटी खर्च करून बांधण्यात येत आहे. हा सर्व निधी शासनामार्फत खर्च करण्यात येत असून राज्यातील हे सुसज्ज दुसरे भाजी मार्केट आहे, असे एपीएमसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांकडून पाठपुरावा

विविध शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी एपीएमसी कार्यालयासमोर दिवस-रात्र धरणे आंदोलन केले. कायद्याच्या चौकटीत राहून लढा दिला. यामध्ये कर्नाटक राज्य हसिरू सेनेचे राज्याध्यक्ष चन्नाप्पा पुजार, भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, निगिलयोगी रयत संघाचे राज्याध्यक्ष धर्मराज गौडर, अॅड. नितीन बोलबंडी, सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर आदींनी अधिक परिश्रम घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

बेकायदेशीर उभारलेल्या जय किसान भाजी मार्केट विरोधात शेतकऱ्यांनी अनेकवेळा एपीएमसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, आमदार चन्नराज हट्टीहोळी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आश्वासन दिले होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शेतकरी संघटनांनी मोर्चा कढून आंदोलने केली होती. याबाबत सर्वतोपरी न्यायालयीन लढा लढला होता. अखेर या लढ्याला यश मिळाले असून हा शेतकऱ्यांचा विजय आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.