For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपैशुन्य, दया, अक्रोध, अचापल्य व धृती

11:11 PM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अपैशुन्य  दया  अक्रोध  अचापल्य व धृती
Advertisement

अध्याय दहावा

Advertisement

एक संत सोडले तर इतर माणसांच्या स्वभावात रज, तम गुणांचे प्रमाण जास्त असते पण रजोगुणी मनुष्याला पुनर्जन्म मिळतो तर तमोगुणी मनुष्य नरकात जातो हे लक्षात घेतले तर ज्याला मुक्ती हवी आहे त्याने त्याच्यातील सत्वगुणाची वाढ करणं आवश्यक आहे. त्याच्या स्वभावात जसजशी सत्वगुणाची वाढ होत जाईल तसतसे रज, तम गुणांचे प्रमाण कमीकमी होत जाईल. असे करत करत एक अवस्था अशी येईल की, त्या मनुष्याच्या स्वभावात सत्व, रज, तम हे तिन्ही गुण सारख्याच प्रमाणात असतील. अशा माणसाला मुक्ती मिळणार हे निश्चित असते. अगदी लहान मुलांच्यात आणि आपल्या संत मंडळींच्या स्वभावात हे गुण सारख्या प्रमाणात असतात. म्हणून लहान मुले आणि संत हे दोघेही निरागस असतात. थोडक्यात गुणांची साम्यावस्था असली की, माणसाचा स्वभाव सात्विक होत असल्याने त्यांची वागणूक आदर्शवत असते. गुणांची साम्यावस्था होण्यासाठी आपला स्वभाव कसा आहे आणि कसा असायला हवा, हे समजण्यासाठी सत्वगुणाचा प्रभाव असलेल्या दैवी स्वभावाचा माणूस कसा असतो त्याचा सविस्तर अभ्यास आपण करत आहोत. जेणेकरून आपल्या वागण्यात होत असलेली चूक दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करू शकू.

अपैशुन्य:-कुणाची चुगली करणे, चहाडी करणे याला पिशुनता असे म्हणतात. दैवी स्वभावाचा माणूस असे कधीही करत नाही. याला अपैशुन्य असे म्हणतात. प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धाप्रमाणे वागत असतो असं म्हणून तो त्याच्या वागण्याबोलण्याला सोडून देतो. तसेच तो काही कटू बोलला असेल किंवा वागला असेल तर आपण पूर्वी कधी कुणाशी तरी असे वागलो असणार, त्याची परतफेड झाली असे तो समजतो.

Advertisement

दया:-दैवी स्वभावाचा मनुष्य दुसऱ्याचे दु:ख पाहून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराच्या भक्तीमुळे जसजसा त्याचा स्वभाव विशाल होत जातो तसतसा त्याचा दयाळू स्वभाव फक्त स्वत:च्या संबंधित लोकांपुरता मर्यादित न राहता सर्व समाजाच्या दु:खनिवारणासाठी कार्य करण्यास त्याला प्रवृत्त करतो. पुढे पुढे तर त्याला अशी सवय लागते की, अमुक एक मनुष्य अमुक ठिकाणी अडचणीत येणार आहे हे आधीच ओळखून तो त्याला मदत करण्यासाठी अगोदरच तेथे हजर असतो.

अक्रोध:- तमोगुणी माणसाचा स्वभाव रागीट असतो. एव्हढ्यातेव्हढ्या करणावरून त्याला समोरच्या माणसाचा राग येतो. मात्र दैवी स्वभावाच्या माणसाला राग येत नाही. कधी आलाच तरी तेव्हढ्यापुरता असतो. त्यातुन त्याचे भले व्हावे, त्याला त्याची चूक कळावी व ती त्याने पुन्हा करू नये एव्हढाच हेतु असतो. दुसऱ्याने आपले वाईट केले, नुकसान केले म्हणून त्याचा त्याला कधी राग येत नाही कारण स्वत:चे वाईट होणे, नुकसान होणे हे तो आपल्या पूर्वकृत्याची परतफेड समजतो. तसेच कुणी कसेही वागले तरी आपले यशापयश हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे हे त्याला मान्य असते.

अचापल्य:- रजोगुणी मनुष्य स्वस्थ बसू शकत नाही. सतत काही ना काही करत राहण्याच्या प्रयत्नात त्याच्या शरीराच्या अकारण हालचाली होत असतात आणि तोंडाने त्यांची अखंड बडबड चालू असते. मात्र सत्वगुणी मनुष्य कधीही शरीराच्या आकारण हालचाली करत नाही, ह्यात बोलण्याची क्रिया सुद्धा येते. दैवी स्वभावाच्या माणसाचे मन स्थिर असते. योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात यावर त्याचा विश्वास असतो. त्यामुळे तो निष्कारण धावपळ करत नाही व वायफळ बडबड करत नाही.

धृती:-कोणत्याही परिस्थितीत दैवी मनुष्य कधीही विचलित होत नाही. त्याची वाटचाल त्याच्या ध्येय धोरणानुसार व नितीमत्तेनं चालू असते. कुणी कितीही बोललं किंवा नावं ठेवली तरी न डगमगता तो त्याची धार्मिक कृत्ये चालू ठेवतो. याला श्रेष्ठ प्रतीचे धैर्य लागते त्याला धृती असं म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.