कुणीही या...अन् कचरा टाकून जा...
कॅन्टोन्मेंटमधील स्थिती : कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये रस्त्याशेजारी फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मिलिटरी डेअरी फार्म तसेच रामघाट रोड, संचयनी सर्कल, वनिता विद्यालय कॉर्नर परिसरात ‘कुणीही या.... अन् कचरा टाकून जा...’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. शहरातील कचरा कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागांवर टाकला जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहराच्या मध्यभागी कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द आहे. बोर्डकडून दररोज कचरा उचल केला जातो. परंतु शहरातील कचरा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खुल्या जागांवर अथवा रस्त्यांशेजारी डंपिंग केला जात आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिकसह मृत जनावरे, हॉटेलमधील शिल्लक पदार्थ फेकले जात असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच परिसरात दुर्गंधीही पसरत आहे.
दोन दिवसापूर्वी डेअरी फार्म रस्त्यावर एका रिक्षामधून आणण्यात आलेला पोती भरून कचरा फेकला जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. कॅन्टोन्मेंट बोर्डने काही ठिकाणी सीसीटीव्हीही बसविले आहेत. तरीदेखील खुल्या जागांवर कचरा फेकला जात आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या स्वच्छ जागांवर कचऱ्याचे ढीग निर्माण होत असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मिलिटरी हॉस्पिटल रोड, रामघाट रोडवर रस्त्याशेजारी कचरा फेकत असलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. कचरा फेकतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करून अशा नागरिकांवर दंडात्मक तसेच तो कचरा पुन्हा उचलण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही दिवस कचरा फेकण्याचे प्रकार बंद झाले होते. परंतु पुन्हा कचरा फेकण्याला सुरुवात झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.