महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बालकांचे चिंतादायी कृत्य

06:30 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समाज माध्यमांचा पगडा सध्या जनतेवर बसलेला आहे. समाज माध्यम हे जरी प्रभावी साधन असले तरीदेखील त्याचा कितपत वापर करावा, हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. भारतात कोविडचा मोठ्या प्रमाणात झपाट्याने फैलाव झाल्यानंतर इतर माध्यमांवर गंभीर परिणाम झाले आणि समाजमाध्यमे फार प्रभावी ठरली. तिथपासून समाजमनावर समाजमाध्यमांतून आघात होत गेले. आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरांना देखील आव्हाने याच माध्यमातून मिळाली. समाज माध्यमांचा युवा पिढीवर गंभीर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच अलीकडे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण आंध्रप्रदेशात उघड झाले. छोटी-छोटी मुले गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकली. अद्याप मिसरूड देखील फुटले नसावे. ओठ पिळले तर दूध निघणार. अशा वयोगटातील मुलांनी जो काही गंभीर प्रकार केलेला आहे, तो अत्यंत लांच्छनास्पद तर आहेच शिवाय भविष्याविषयी चिंता निर्माण करणाराही आहे. आंध्रप्रदेशातील सदर घटना 7 जुलै रोजी झालेली. ही अशी एक घटना आहे, ती ऐकून आपल्याला धक्का बसणार हे नक्की व त्याही पलीकडे जाऊन या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी पालकांनी जी पाऊले उचलली, ती त्याहीपेक्षा गंभीर स्वरुपाची होती. नांदयाल येथे 7 जुलै रोजी कोवळ्या आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला व नंतर तिचा खून करण्यात आला. याविषयी पोलिसांनी दोघा व्यक्तींना अटक केली होती. त्यातील एक होता बाप आणि दुसरा काका. या प्रकरणातील जे आरोपी आहेत, ती आहेत बारा आणि तेरा वर्षांची तीन बालके. दोन बारा वर्षांची मुले, इयत्ता सहावीत तर तेरा वर्षांचा बालक हा इयत्ता सातवीत आहे. या शाळकरी मुलांच्या हाती आई-वडिलांनी भ्रमणध्वनी दिले. हे भ्रमणध्वनी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यातून मुलांना आई-वडिलांशी व आईवडिलांना मुलांशी थेट संपर्क साधता येतो परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अलीकडे अनेक मुले ही जशी भ्रमणध्वनीचा गैरवापर करीत असतात, तसा गैरवापर या तिन्ही मुलांनी केला. त्यांनी एकेठिकाणी जाऊन त्यावर अश्लिल चित्रफित पाहिली. मुलांमध्ये हार्मोन्स बदलण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होत असतानाच त्यांच्यावर लक्ष देणे आवश्यक असते. या मुलांनी अश्लिल चित्रफित पाहिली आणि आपणही तसेच करावे, या इराद्याने त्यांनी एका बालिकेला गाठले. ती तर केवळ आठ वर्षांचीच होती. त्यानंतर या बालकांनी चित्रफितीत जे दाखविण्यात आले त्यानुसार अत्याचार या बालिकेवर तिघांनीही केले. प्रकार घडल्यानंतर सदर बालिका घरी जाऊन झाल्या प्रकाराची माहिती देईल म्हणून तिघांनीही तिचे तोंड बंद करून तिला मारून टाकले. बालिका मृत पावल्यानंतर तिघेजण घाबरले आणि त्यांनी एका कालव्यामध्ये तिचा मृतदेह लपवून ठेवला. पैकी एका मुलाने आपल्या घरी गेल्यानंतर थोडीफार माहिती देऊन एक बालिका मरण पावल्याचे सांगितले. बापाने थेट पोलीस स्थानक गाठण्याऐवजी कहर म्हणजे आपल्या भावाला म्हणजेच मुलाच्या काकाला घेऊन तिचा मृतदेह शोधून काढून तिच्या गळ्यात धोंडा बांधला व दुचाकीवरून नेत तो कृष्णा नदीत फेकून दिला. त्यांनी अशाप्रकारे पुरावा नष्ट करण्याचे काम केले. या प्रकरणानंतर बालिका घरातून गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला. मृतदेह सापडल्यानंतर श्वान पथकाने थेट आरोपीच्या घरीच ठाण मांडले. त्यानंतर चौकशीत सारी माहिती उघड झाली. हा प्रकार उघड झाल्यानंतर ना केवळ आंध्र प्रदेशातच खळबळ माजली तर साऱ्या देशात हा विषय चर्चेचा बनला. अद्याप मिसरूड देखील फुटलेले नाही, अशा बालकांनी क्रूरतेची परिसीमा गाठणे, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्यभिचार वाढतोय. भविष्यात आपल्याला काय काय पाहावे लागणार, कोणास ठाऊक. समाज माध्यमांतून जी काही भडक चित्रणे प्रसारित होतात, अर्धनग्न व त्याही पलीकडची चित्रे वगैरेतून नव्या पिढीवर  विपरित परिणाम होतात. आपले हित कशात आहे? याची जाणीव देखील नसलेल्या व निर्णय क्षमता देखील नसलेल्या बालकांकडून अशा प्रकारचे गुन्हेगारीचे प्रकार होत आहेत, याचे कारण म्हणजे संस्कारांचा अभाव. संस्काराविना अनेकांचे भवितव्य भरकटत आहे. आपले वैयक्तिक जीवन सोडा परंतु अशा प्रकारची एक पिढी जर का तयार होत असेल तर उद्याचे जग म्हणून ज्या युवावर्गाकडे आपण पाहतो, त्या युवावर्गाचे होणार तरी काय? जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या भारतात देखील युरोपियन राष्ट्रांमधील युवा वर्गामध्ये जसा स्वैराचार वाढत आहे, त्याचे लोण पसरत तर नाही ना? ज्यांना कोणतीही अक्कल नाही, अशा बालकांनी लैंगिक अत्याचार करण्यापर्यंत मजल मारावी! एवढे करून न थांबता या बालकांनी छोट्या बालिकेची निर्घृण हत्या करावी! हा सारा प्रकार थरकाप उडविणारा आहे. ज्या बालकांवर गंभीर प्रकारची कारवाई करता येत नाही, अशा बालकांकडून गंभीर पद्धतीचे गुन्हे व्हावेत, हा प्रकारच मुळी सखेदाश्चर्य आहे. आंध्र प्रदेशातील घटनेचे पडसाद सर्वत्र उमटतील. अनेक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापनांना तसेच पालकांना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शाळांमध्ये भ्रमणध्वनीवर गोव्यात तरी बंदी आहे. परंतु मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, असा संदेश जी मोठ-मोठी तज्ञ मंडळी सांगतात, त्याला काहीतरी अर्थ आहे, हे या घटनेवरुन पटण्यासारखे निश्चितच आहे. दुर्दैवाने पाच ते सहा वर्षांचे बालकच आज चांगल्याप्रकारे भ्रमणध्वनी चालवितात. देशातील बहुतेक सारी यंत्रणा ऑनलाईन होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच मोबाईल हाती घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या भ्रमणध्वनीवरून आपण समाजमाध्यमांशी जोडले जातो. त्यातून चांगले आहे व तापदायकही आहे. गुन्हेगारीला काही बाबतीत उत्तेजना मिळते. त्यातून युवा पिढीवर अत्यंत गंभीर व वाईट संस्कार होत चालले आहेत. भ्रमणध्वनीचा अतिवापर हा अतिघातक ठरतोय. त्याचाच हा आंध्रमधील घटनेचा परिपाक म्हणावा लागेल. या देशात संस्कार आहे. सारे जग भारताकडे एक सुसंस्कृत राष्ट्र म्हणून ताठ मानेने पाहतेय. जगातील अनेक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये भारतीय संस्कारांचे अनमोल मोती अशा पद्धतीचे शिक्षणही दिले जातेय. आणि आपल्या देशातील ही मुले फार शेफारलेली आहेत. अत्यंत लहान वयात साऱ्या सुविधा विनाकष्ट मिळू लागल्यानंतर काय होणार? नव्या पिढीवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. भारताला संस्कारक्षम शिक्षण हा फार मोठा आधार आहे व साऱ्या जगाला संस्काररुपी ज्ञान देण्याची क्षमताही या देशाकडे आहे. असे असताना अशी कपाळकरंटी मुले जन्माला यावीत, हे दुर्दैव आहे. आंध्र प्रदेशातील घटनेतून आपण सारेजण बोध घेणार आहोत का?

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article