केंब्रिज विद्यापीठात अनुष्का काळे यशस्वी
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनमधील जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित केंब्रिज युनियन सोसायटीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची विद्यार्थिनी अनुष्का काळे हिची निवड झाली आहे. हे पद भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीस मिळण्याची ही या विद्यापीठाच्या इतिहासातील प्रथमच वेळ आहे. त्यामुळे तिचे यश महत्वाचे मानले जात आहे. मुख्य म्हणजे तिची निवड विनाविरोध झाली आहे.
अनुष्का काळे ही विद्यार्थिनी 20 वर्षांची असून ती विद्यापीठात डाटाबेस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. केंब्रिज विद्यापीठाची ही संस्था जगातील सर्वोत्तम वादविवाद संस्थांपैकी एक (डिबेटिंग सोसायटी) म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे अध्यक्षपद मिळणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. या पदासाठीच्या निवडणुकीत अनुष्का काळे ही एकमेव उमेदवार होती. तिला संस्थेच्या सदस्यांपैकी 126 जणांना मतदान केले. त्यामुळे तिची 2025 या वर्षासाठीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
इतिहासप्रसिद्ध संस्था
केंब्रिज युनियन सोसायटी या वादविवाद संस्थेची स्थापना इसवीसन 1815 मध्ये करण्यात आली होती. ही संस्था वादविवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि बुद्धीवाद प्रोत्साहन यासाठी जगात प्रसिद्ध आहे. या संस्थेच्या सदस्यांमध्ये जगभरातील मान्यवर आणि प्रभावी व्यक्तीमत्वांचा समावेश असतो. अर्थशास्त्रज्ञ मेनार्ड केन्स, विश्वविख्यात कादंबरीकार रॉबर्ट हॅरिस, कोब्रा बियलचे संस्थापक लॉर्ड करण बिलिमोरिया आदी मान्यवर या संस्थेचे सदस्य राहिलेले आहेत.
समावेशकत्वाचे उदाहरण
अशा विख्यात संस्थेच्या अध्यक्षपदी एका भारतीय वंशाच्या आणि तरुण विद्यार्थिनीची निवड होणे हे संस्थेच्या सर्वसमावेशक स्वरुपाचे आणि विचारवैविध्याला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नाचे द्योतक मानले जात आहे. अनुष्का काळे ही विद्यार्थिनी या संस्थेच्या दक्षिण आशियायी विभागाची सदस्या आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये मूळ असणाऱ्या अत्यंत कमी विद्यार्थ्यांची निवड आतापर्यंत या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी झाली आहे. तर भारतीय वंशाची ती प्रथमच विद्यार्थिनी आहे. अनुष्का काळे हिचे सध्या केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सिडनी ससेक्स महाविद्यालयात इंग्रजी साहित्य या विषयात अध्ययन होत आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात संस्थेला नवी दिशा देण्यासाठी ती उत्सुक आहे.
विख्यात व्यक्तीमत्वांचा सहभाग
या संस्थेच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि चर्चासत्रांमध्ये आतापर्यंत थिओडोर रुझवेल्ट आणि रोनाल्ड रेगन या अमेरिकेच्या दोन दिवंगत माजी अध्यक्षांनी भाग घेतला आहे. तसेच विन्स्टन चर्चिल, मार्गारेट थॅचर आणि जॉन मेजर या तीन माजी ब्रिटीश नेत्यांचाही सहभाग या संस्थेच्या उभारणीत राहिलेला आहे. याशिवाय थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, बिल गेट्स्, दलाई लामा आदी जगप्रसिद्ध व्यक्तीमत्वेही या संस्थेच्या विविध कार्यांशी जोडली गेली आहेत.
अनुष्का काळेची ध्येये
या अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वविख्यात संस्थेचे अध्यक्षपद मला मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संस्थेचे कार्य वेगाने पुढे नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. संस्थेच्या विविध चर्चा कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमधील जगभरातील मान्यवरांचा सहभाग सुनिश्चित करणे, संस्थेत अंतर्भूत असणाऱ्या विविध सांस्कृतिक गटांचा एकमेकांच्या घनिष्ट संपर्क स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, संस्थेच्या सर्वसमावेशकत्वाचे संवर्धन करणे, तसेच संस्थेचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम असणाऱ्या ‘समर गार्डन पार्टी’ त सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही समाविष्ट होता यावे, यासाठी या कार्यक्रमाचे सहभागशुल्क कमी करणे इत्यादी कामे मला करायची आहेत, असे तिने स्पष्ट केले आहे.