‘अंत्योदय’ महिलांना मिळणार रेशन दुकानात मोफत साडी!
जिह्यातील सुमारे 85 हजार कुटूंबांना होणार लाभ; वर्षातून एकदा सणानिमित्त मिळणार भेटराज्य सरकारची योजना
कोल्हापूर प्रवीण देसाई
अंत्योदय रेशनकार्डधारक कुटूंबातील एका महिलेला रेशन दुकानातून मोफत साडी देण्याची महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. वर्षातून एकदा सणानिमित्त ही साडी देण्यात येणार आहे. या योजनेचा जिह्यातील सुमारे 85 हजार 200 रेशनकार्डधारक कुटूंबांना लाभ होणार आहे. याची वितरणाची जबाबदारी जिह्यातील 1657 रेशन दुकानदारांवर राहणार आहे.
राज्य सरकारने राज्याचे ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28’ जाहीर केले आहे. या धोरणानुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली एक साडी अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबाला मोफत वाटप करण्यात येणार आहे. या साडीचे वितरण हे रेशन दुकानांमधून होईल. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, नवी मुंबई या संस्थेला नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेने त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या यंत्रमाग सहकारी संस्था, तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतर्गत नेंदणीकृत घटकांकडून निर्धारित केलेले तांत्रिक निकष विचारात घेऊन साडेचे उत्पादन करायचे आहे. या साडीचे वितरण कोणत्या सणाला करायचे हे सरकारकडून निश्चित केले जाणार आहे. या साडीचे वितरण करण्यापूर्वी त्यांचे शासन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून तपासणी कऊन घेण्याची जबाबदारी महामंडळावर राहणार आहे. तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रेशन दुकाननिहाय अंत्योदय रेशनकार्डधारक कुटूंबांची यादी महामंडळाला उपलब्ध कऊन द्यायची आहे. त्यानुसार साड्या रेशन दुकानाच्या नावानुसार तालुकास्तरावरील गोदामापर्यंत महामंडळाकडून पोहोचविल्या जाणार आहेत. त्यानंतर साडी वाटप व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी ही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर राहणार आहे. त्यांनी याबाबतचा अहवाल 15 दिवसात वस्त्रोद्योग विभागाला सादर करायचा आहे. या योजनेमुळे अंत्योदय कुटूंबातील महिलेला वर्षातून एकदा सणानिमित्त साडी मिळणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल.
जिह्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक व दुकानदारांची संख्या
तालुका अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंब रेशन दुकाने
आजरा 29318 87
भुदरगड 33404 96
चंदगड 37100 140
गडहिंग्लज 47396 97
गगनबावडा 6836 30
हातकणंगले 100315 150
इचलकरंजी 75226 103
कागल 57402 103
करवीर 91044 160
कोल्हापूर शहर 149919 163
पन्हाळा 53594 128
राधानगरी 43500 126
शाहुवाडी 39585 135
शिरोळ 85561 139
------------------
एकूण 850200 1657
-------------------
अंत्योदय रेशनकार्डधारक कुटूंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना राज्य सरकारकडून सुऊ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. या योजनेसंदर्भात जे मार्गदर्शन राज्य सरकारकडून येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर