अँटीस्टॅबिंग स्क्वॉडकडून संशयितांची तपासणी सुरूच
बेळगाव : बसच्या खिडकीकडील सीटवर बसण्याच्या वादातून विद्यार्थ्यावर चाकू हल्ल्याची घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अँटीस्टॅबिंग स्क्वॉडची स्थापना केली आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी तपासणी करून प्राणघातक शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. या स्क्वॉडकडून अद्यापही शहर व उपनगरासह ग्रामीण भागात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या कॉलेज बॅगमध्ये वह्या-पुस्तकांऐवजी प्राणघातक शस्त्रs घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अभ्यास करण्याच्या वयात तरुणपिढी गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. क्षुल्लक कारणावरून मध्यंतरी सीबीटीवर एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून पोलीस आयुक्तांनी अँटीस्टॅबिंग स्क्वॉडची स्थापना केली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी विविध ठिकाणी थांबून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणांच्या बॅगांची तपासणी करत आहेत. मंगळवारी अँटीस्टॅबिंग स्क्वॉडकडून पुन्हा विविध ठिकाणी तरुणांची अडवणूक करून बॅगांची तपासणी करण्यात आली. ही कारवाई यापुढेदेखील सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.