अँटीस्टॅबिंग स्क्वॉड, अल्कोब्रेथ अॅनालायझर, नार्को किटही तयार
राज्योत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची जय्यत तयारी : हुल्लडबाजांना घालणार लगाम
बेळगाव : शनिवारी होणाऱ्या राज्योत्सव मिरवणूक बंदोबस्तासाठी 3 हजारहून अधिक पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. मिरवणुकीवर दहा ड्रोनची नजर असणार आहे. याबरोबरच जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बंदोबस्ताविषयीची माहिती दिली आहे. पोलीस आयुक्तांसह 180 हून अधिकारी, 2300 पोलीस, 400 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 10 व सशस्त्र दलाच्या 8 तुकड्या बंदोबस्तात असणार आहेत. प्लाझ्मा म्युझिक व लेझर लाईटवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिरवणुकीत अप्रिय घटना टाळण्यासाठी अँटीस्टॅबिंग स्क्वॉड, अल्कोब्रेथ अॅनालायझर असणार आहेत. नशेबाजांच्या तपासणीसाठी नार्को किटही पोलिसांजवळ असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 नंतर आवाजावरही निर्बंध असणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रासाठी रेशीम खात्याचे उपसंचालक महेशकुमार वाघे, शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण विभागाचे अधिकारी एफ. यु. पुजेर, माळमारुती व एपीएमसी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रासाठी पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. रवी सालीगौडर, खडेबाजार व कॅम्प पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रासाठी समाज कल्याण खात्याचे साहाय्यक संचालक बी. आर. चन्नयन्नावर, टिळकवाडी व उद्यमबाग पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रासाठी महिला व बालकल्याण खात्याचे आण्णाप्पा हेगडे यांची नियुक्ती केली आहे.
वाहनचालकांची होणार कोंडी
शनिवारी वाहनचालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शहराच्या मुख्य मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. चन्नम्मा सर्कलकडे येणारी सर्व वाहने जिनाबकुळ सर्कलजवळच वळवून खानापूर रोडकडे पाठविण्यात येणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाकडून शनिवार खूटकडे येणारी वाहतूक जिजामाता सर्कलमार्गे ग्लोब सर्कलकडे वळविण्यात येणार आहे. खानापूरहून येणारी वाहतूकही काँग्रेस रोड मिलिटरी महादेव मार्गे बॉक्साईट रोडवर वळविण्यात येणार आहे. सरदार्स हायस्कूल मैदान, सीपीएड मैदान, महिला पोलीस ठाण्यापाठीमागे व न्यायालय आवारात पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.