लंडनमध्ये स्थलांतरित विरोधात मोर्चा
लाखो लोक उतरले रस्त्यांवर : अनेक पोलिसांवर हल्ले
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनची राजधानी लंडनच्या मध्य भागात सुमारे 1 लाखाहून अधिक निदर्शकांनी स्थलांतरविरोधी मोर्चा काढला आहे. हा मार्चा स्थलांतरविरोधी कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सनच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चादरम्यान अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले देखील झाले आहेत. हा मोर्चा ‘युनाइट द किंग्डम’ मार्च या नावाने आयोजित करण्यात आला होता, ज्यात सुमारे 1 लाख 10 हजार लोकांनी भाग घेतला आहे. या मोर्चाला अमेरिकेतील अब्जाधीश एलन मस्क यांनीही संबोधित केले आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये हा सांस्कृतिक क्रांतिचा निखारा पेटला आहे. हीच आमच्यासाठी संधी आहे. कायदा आणि न्यायालयांमध्ये आता अवैध स्थलांतरितांना स्थानिक समुदायाच्या तुलनेत अधिक अधिकार मिळतात. हा प्रकार ब्रिटिश जनतेसाठी न्यायपूर्ण नाही. देशात वाढती घुसखोरी ब्रिटिश ओळखीला संकटात आणत असल्याचा दावा रॉबिन्सन यांनी केला.
रॉबिन्सन यांचा मोर्चा ‘स्टँड अप टू रेसिज्म’ (वंशद्वेषाच्या विरोधात) निदर्शनासोबत झाला, ज्यात सुमारे 5 हजार लोक सामील झाले. दोन्ही गटांमधील झटापट रोखण्यासाठी पोलिसांना दिवसभर प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी ‘युनाइट द किंगडम’ मोर्चात सामील निदर्शकांना नो प्रोटेस्ट झोनमध्ये जाण्यापासून, पोलिसांचा सुरक्षा कडे तोडणे आणि विरोधी गटानजीक जाण्यापासून रोखले आहे. मोर्चादरम्यान अनेक अधिकारी हल्ल्याचे शिकार ठरले. याच्या प्रत्युत्तरादाखल अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरक्षा उपकरणे परिधान केलेले अधिकारी आणि अश्वारुढ पोलिसांच्या मदतीने कायदा-सुव्यवस्थेला नियंत्रित करण्यात आले. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी एकजूट होत मध्य लंडनमधील रस्त्यांवर जमा झालो आहोत, यात लाखो लोक सामील आहेत असे रॉबिन्सन यांनी एक्सवर स्वत:च्या संदेशात नमूद पेले आहे.
मोर्चाला सुरुवात कुठून?
हा मोर्चा ब्रिटनमध्ये स्थलांतरितांना आश्रय दिलेल्या हॉटेल्सबाहेर निदर्शनांसोबत सुरू झला. यात सामील लोकांनी युनियन जॅक आणि लाल-पांढऱ्या रंगाचा जॉर्ज क्रॉस असलेले ध्वज झळकविले. काही लोकांनी अमेरिकेचा तसेच इस्रायलचा ध्वजही झळकविला. अनेक निदर्शकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची कॅप परिधान केली होती. निदर्शकांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर टीका करत ‘स्थलांतरितांना मायदेशी पाठवा’ अशा घोषणा दिल्या. काही लोक स्वत:च्या मुलांसमवेत मोर्चात सामील झाले होते. मोर्चादरम्यान निदर्शकांनी अमेरिकेतील रुढिवादी नेता चाली किर्कच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला.
कोणी आहे टॉमी रॉबिन्सन?
टॉमी रॉबिन्सनचे मूळ नाव स्टीफन याक्सली-लेनन आहे. त्यांनी या मोर्चाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वरुपात सादर केले आहे. शासनाच्या त्रुटी उघड करणारा पत्रकार अशी स्वत:ची ते ओळख करून देतात. अमेरिकेतील अब्जाधीश एलन मस्क हे स्वत:चे समर्थक असल्याचा त्यांचा दावा आहे. रॉबिन्सन ब्रिटनमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत, परंतु देशातील सर्वात मोठा स्थलांतरितविरोधी पक्ष रिफॉर्म यूकेने त्यांच्यापासून अंतर राखले आहे. यामागील रॉबिन्सन यांच्याविरोधात नोंद गुन्हे कारणीभूत असल्याचे मानले जाते.
1600 हून अधिक पोलीस तैनात
लंडन पोलिसांनी शहराच्या सुरक्षेसाठी 1600 हून अधिक कर्मचारी तैनात केले होते, यात 500 अतिरिक्त अधिकारी सामील होते, जे अन्य दलांमधून मदतीसाठी बोलाविण्यात आले हेत. पोलिसांचे काम केवळ निदर्शनांना सांभाळणे नव्हते, तर शहरात होत असलेला फुटबॉल सामना आणि संगीत कार्यक्रमांची सुरक्षा पाहणेदेखील होते.
सुरक्षेचा भरवसा
या मोर्चाला आम्ही अन्य निदर्शनांप्रमाणेच हाताळले आहे. आम्ही कुठलाही पक्षपात किंवा भीतीशिवाय काम केले आहेस. लोकांना स्वत:च्या वैध अधिकारांचा वापर करता येईल. परंतु जर गुन्हा घडला तर पोलीस शक्तिनिशी कारवाई करतील असे पोलीस कमांडर क्लेयर हेन्स यांनी सांगितले. तसेच त्यांनी मागील निदर्शनांमध्ये मुस्लीमविरोधी वक्तव्ये आणि अल्पसंख्याकांकडून आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचे यावेळी मान्य केले. लंडनमध्ये प्रत्येक जण सुरक्षित राहिल आणि कुठल्याही भीतीशिवाय स्वत:चे काम करू शकेल हे पोलीस सुनिश्चित करतील असे हेन्स यांनी सांगितले.
व्हिडिओ लिकंद्वारे मस्क सामील
लंडनमध्ये आयोजित या मोर्चात मस्क यांनी भाग घेतला. त्यांनी जमावाला संबोधित करत ब्रिटिश संसद भंग करणे आणि सरकार बदलण्याची मागणी केली. ब्रिटनच्या सुंदरतेनंतरही देश ‘स्थलांतराच्या भीषण लाटेमुळे उदध्वस्त होत आहे. हा प्रकार सुरूच राहिल्यास लोकांना एक तर लढावे लागेल किंवा मरावे लागेल असा दावा मस्क यांनी केला.