आसाममध्ये अतिक्रमणविरोधी अभियान
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाम सरकारने राज्यात सर्वत्र अतिक्रमणविरोधी अभियानाचा धडाका लावला आहे. राज्याच्या गोपालपुरा भागात सरकारी जागांवर अतिक्रमण करुन बांधण्यात आलेल्या अनेक इमारती पाडविण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींच्या मालकांना नियमाप्रमाणे नोटीस देण्यात आली होती. नोटीसीला उत्तर न आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गोपालपुराच्या प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाचे अधिकारी आणि अतिक्रमणविरोधी पथक त्यांच्या कारवाईसाठी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. आम्ही येथे तीन पिढ्यांपासून रहात आहोत, असे स्थानिकांचे म्हणणे होते. तथापि, प्रशासनाने ही स्थिती आधीच ओळखून मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे स्थिती नियंत्रणात राहिल्याची माहिती देण्यात आली. ही कारवाई कोणत्याही एका धर्माविरुद्ध झालेली नसून कोणताही पक्षपात करण्यात आलेला नाही. एकंदर 44 कुटुंबांची बांधकामे नियमबाह्या असल्याने पाडविण्यात आली आहेत, असे स्पष्टीकारण अधिकाऱ्यांनी केले.
अभियान राज्यभरात
आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी राज्यभरात अतिक्रमण विरोधी अभियान चालविण्याचा आदेश दिला आहे. अनेक शहरांमध्ये सरकारी जमीनींवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हजारो एकर जमीन आज अतिक्रमण माफियांच्या हाती गेली आहे. ही सर्व सरकारची मालमत्ता असून ती परत मिळविण्याचा सरकारला अधिकार आहे. त्यामुळे हे अभियान समर्थनीय ठरते. राज्याच्या प्रत्येक भागात ते चालविण्यात येत आहे, असे प्रतिपादन सर्मा यांनी केले आहे.