निर्माण होतेय ‘प्रतिपृथ्वी’
आपल्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात एक कथा आजही सांगितली जात आहे. विश्वामित्र नावाचे त्र षी होते. त्यांनी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीसारखी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा निर्धार केला होता. परंतु त्यांना त्यात फारसे यश आले नव्हते. त्यांनी प्रतिमानव निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात ‘नारळ’ निर्माण झाला, अशा प्रकारची ही कथा आहे. सांप्रतच्या विज्ञानयुगातही अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. अर्थात, हे व्हर्चुलर स्वरुपाचे, अर्थात आभासी पद्धतीचे आहेत. हे प्रतिपृथ्वी आणि मग या पृथ्वीवर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे प्रयोग जगप्रसिद्ध स्वीडीश व्हिडीओ गेम ‘माइनक्राफ्ट’ वर केले जात आहेत. ही प्रतिनिर्मिती करण्यासाठी एक नव्हे, तर सहस्रावधी आधुनिक ‘विश्वामित्र’ कार्यरत झालेले आहेत. आतापर्यंत साधारणत: आठ हजार गेमर्सनी या निर्मितीकार्यात सहभाग घेतला असून ही संख्या भविष्यात वाढणार आहे. या प्रयोगाचा प्रारंभ 2020 मध्ये झाला होता. आता या प्रयत्नाला गिनीज विक्रम पुस्तिकेतही स्थान मिळाले आहे. ‘पाईपन एफटीएस’ या सांकेतिक नावाच्या एका गेमरने या प्रयोगाला चालना दिली होती आणि इतर गेमर्सनाही सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरुन आज असंख्य गेमर्स यात गुंतले आहेत. ही गेमर्स मंडळी पृथ्वीचा प्रत्येक चौरस इंच या गेममध्ये निर्माण करणार आहेत. हा ‘माईनक्राफ्ट’चा सर्वात मोठा प्रकल्प असून भविष्यात तो आणखी विस्तारणार आहे. आतापर्यंत पृथ्वीच्या 76 कोटी चौरस मीटर भागाचे प्रतिनिर्माणकार्य पूर्ण करण्यात आले आहे. हे क्षेत्रफळ पृथ्वीच्या एकंदर क्षेत्रफळाच्या केवळ 0.0000001506 टक्के इतके आहे. याचाच अर्थ असा की हा प्रयोग पूर्ण होण्यासाठी कित्येक वर्षे लागण्याचा संभव आहे. या प्रयोगाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून या गेमर्सना साहाय्य करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि डिस्कॉर्ड चॅट रुम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रयोगाचे महत्वाचे वैशिष्ट्या असे की तो केवळ मानवी बुद्धीमत्तेच्या आधारावर केला जात असून ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास पूर्णत: अनुमती नाकारण्यात आली आहे. तेव्हा, हे आधुनिक ‘गेमर्स विश्वामित्र’ ही आभासी प्रतिपृथ्वी आणि प्रतिसृष्टी कशी आणि केव्हा पूर्ण करतात, याची उत्सुकता आहे.