बांगला देशात जाळले आणखी एक मंदीर
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशात इस्लामी धर्मांधांनी आणखी एका हिंदू मंदिराला आग लावली आहे. या आगीत या मंदिरातील मूर्तीही जळून खाक झाल्या आहेत. त्याचप्रमाणे इस्कॉन या हिंदूंच्या संस्थेचे एक केंद्रही जाळण्यात आल्याची माहिती या संघटनेकडून देण्यात आली आहे. हा हिंसाचार राजधानी ढाका येथे घडला आहे.
या हिंसाचाराची अधिक माहिती कोलकाता येथील इस्कॉन संस्थेचे प्रमुख राधारमण दास यांनी शनिवारी दिली. ढाकामध्ये या संस्थेचे नामहट्ट नामक केंद्र आहे. तसेच या केंद्राशी संलग्न मंदीरही आहे. या दोन्ही वास्तूंना आग लावण्यात आली. या मंदिरातील श्री श्री लक्ष्मी नारायण या देवतेची मूर्ती जाळण्यात आली. तसेच्या या मंदिरातील अन्य धार्मिक आणि पूजापाठाला उपयोगी असलेली सामग्रीही या हिंसाचारात जळून खाक झाल्याची माहिती त्यांनी दिली. बांगला देशात हिंदू आणि अन्य अल्पसंख्य समुदायांविरोधातल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हिंदू समाज भयभीत झाला असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. या देशात आता इस्लाम वगळता अन्य धर्मियांच्या विरोधात द्वेषभावना चरम सीमेवर पोहचली असून अल्पसंख्य समुदायांचे जीवन कठीण झाले आहे. विश्वसमुदायाने या स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.