भारतात पोहोचला तालिबानचा आणखी एक मंत्री
पाकिस्तानसोबत अफगाणिस्तानचा तणाव : भारतासोबत व्यापार वृद्धींगत करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अफगाणिस्तानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारताच्या 5 दिवसीय यशस्वी दौऱ्याच्या काही आठवड्यांनीच तालिबानच्या राजवटीतील उद्योग तसेच वाणिज्यमंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी बुधवारी 5 दिवसीय दौऱ्यांतर्गत नवी दिल्लीत पोहोचले आहेत. पाकिस्तानने संघर्षानंतर अफगाणिस्तानला लागून असलेली भूसीमा बंद केली असून यामुळे अफगाणिस्तानचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर अजीजी हे भारतात दाखल झाले आहेत. तालिबानने स्वत:च्या व्यापाऱ्यांना पाकिस्तान व्यतिरिक्त अन्य देशांसोबतचा व्यापार वाढविण्याचा सल्ला दिला होता.
मंत्री अजीजी यांच्या 5 दिवसीय अधिकृत दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत-अफगाणिस्तान दरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी मजबूत करणे आहे. उद्योग आणि वाणिज्यमंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांचे भारतात स्वागत असल्याचे विदेश मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. विदेशमंत्री आमिर खान मुत्तकी यांचा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भारत दौऱ्यानंतर आता अजीजी यांचा दौरा दोन्ही देशांदरम्यान वृद्धींगत होणारे संबंध आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या विस्ताराच्या स्वरुपात पाहिला जात आहे. या दौऱ्यादरम्यान अजीजी हे भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. मुत्तकी यांच्या दौऱ्यानंतर भारताने काबूल येथील स्वत:च्या तांत्रिक मिशनला पुन्हा पूर्ण दूतावासाचा दर्जा दिला होता.