इस्रोला मिळाले आणखी एक यश
रॉकेट इंजिनसाठी सी-सी नोजलची निर्मिती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यशाची नवी शिखरं गाठत आहे. इस्रोने आता आणखी एक यश मिळविले आहे. इस्रोकडून रॉकेट इंजिनसाठी हलके नोजल तयार केले आहे. रॉकेट इंजिनसाठी हलके कार्बन-कार्बन (सी-सी) नोजलच्या विकासासोबत रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मोठे यश मिळविले आहे, यामुळे पेलोड क्षमता वाढली असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
अंतराळ संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राकडून तयार करण्यात आलेले हे नोजल रॉकेट इंजिनच्या क्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे लाँच व्हेईकल्सचे पेलोड क्षमता वाढविता येणार आहे. तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने कार्बन-कार्बन (सी-सी) कंपोजिट सारख्या अत्याधुनिक सामग्रींद्वारे नोजल डायवर्जेंट निर्माण केल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.
नव्या तंत्रज्ञानाने निर्मित नोजलचा वापर विशेषकरून वर्कहॉर्स लाँचर, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही)साठी होऊ शकणार आहे. इस्रोनुसार पीएसएलव्हीचा चौथा टप्पा पीएस4 मध्ये सध्या कोलंबियम मिश्र धातूने निर्मित नोजलयुक्त जुळ्या इंजिन्सचा वापर होतो. धातूंद्वारे निर्मित या नोजलच्या जागी त्याच्या समकक्ष तयार करण्यात आलेल्या सी-सी हलक्या नोजलचा वापर करत सुमारे 67 टक्क्यांचा भार कमी केला जाऊ शकतो.