इस्रोला मिळाले आणखी एक यश
आदित्य एल1 ने पूर्ण केली हेलो ऑर्बिटची पहिली प्रदक्षिणा
वृत्तसंस्था/ बेंगळुर
आदित्य-एल1 मिशनवरून इस्रोने सोमवारी खूशखबर दिली आहे. आदित्य-एल1 अंतराळयानाने सूर्य आणि पृथ्वीदरम्यान एल लँग्रेजियन बिंदू म्हणजेच हेलो ऑर्बिटची एक प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आदित्य-एल1ने सोमवारी एल1 बिंदूच्या चहुबाजूला स्वत:ची पहिली हेलो कक्षा पूर्ण केल. हे यान 6 जानेवारी रोजी लँग्रेजियन बिंदूवर पोहोचले होते. यानंतर हेला कक्षेची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी यानाला 178 दिवस लागल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. यान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वी आणि सूर्यादरम्यान लँग्रेजियन बिंदू 1 (एल1)च्या चहुबाजुला एक हेलो कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. या मोहिमेद्वारे वायुमंडळ, सौर चुंबकीय वादळे आणि पृथ्वीच्या आसपासच्या पर्यावरणावरील त्यांच्या प्रभावाचे अध्ययन केले जात आहे. ज्याप्रकारे पृथ्वीवर भूकंप होतात, त्याचप्रकारे सौरभूकंप देखील होतात, ज्यांना कोरोनल मास इजेक्शन म्हटले जाते. सौर कंपनाचे अध्यन करण्यासाठी सूर्याचे अध्ययन आवश्यक आहे. सूर्याची निर्मिती, वर्तमान आणि भविष्याचा शोध घेण्यासाठी भारताची पहिली सौरमोहीम राबविण्यात आली आहे. आदित्य या अंतराळयानात 7 पेलोड जोडण्यात आले होते.