पडोसे सत्तरी येथे पुन्हा गोळीबाराची घटना
काडतूस, गनसह एकास अटक
वाळपई : पडोसे - सत्तरीत गेल्या महिन्यात गोळीबारात मोहम्मद अख्तर आलम (35 वर्षे) हा कामगार जखमी झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा गुऊवारी रात्री त्याच ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी एअरगन काडतूस, एअरगन जप्त करुन एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुऊवारी रात्री सुमारे 11 च्या सुमारास एक स्थानिक व्यक्ती त्या मार्गावरून चालत जात असताना त्याच्या बाजूलाच गोळीबार झाल्याचा आवाज आला. हा माणूस थोडक्यात बचावला. त्याने तातडीने पोलिसांना खबर दिल्यानंतर डिचोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले व तपासणी केली. यावेळी त्यांना एअरगन काडतूस सापडल्या. शुक्रवारी सकाळी वाळपई पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह घटनास्थळी जाऊन तपास केला आणि घटनास्थळावरून एअरगन काडतूस जप्त केले. सकाळपासून त्या भागात पोलिसांची चौकशी सुरू होती. अनेकांनी दिलेल्या जबानीनंतर एका व्यक्तीला एअरगनसह चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.