येडियुराप्पांना पुन्हा दिलासा
बेंगळूर : पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना अटक न करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याविरुद्ध 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर बेंगळूरमधील सदाशिवनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविले होते. आपल्याविरोधात दाखल झालेले पोक्सो प्रकरण रद्द करावे, अशी याचिका येडियुराप्पांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी सुनावणीवेळी न्यायालयाने निकाल येईपर्यंत येडियुराप्पा यांना अटक करू नये, असा आदेश सीआयडीला दिला होता. शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने वाद-युक्तिवाद ऐकून येडियुराप्पांना अटक न करण्याच्या आदेशाला मुदतवाढ देत सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.