शेतकऱ्यांकडून पुन्हा रेल्वेरोको
शंभू सीमेवर आंदोलन : 34 रेल्वेगाड्या प्रभावित, 11 रद्द
वृत्तसंस्था/ अंबाला
पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शंभू रेल्वे स्थानकावर रेल्वेमार्ग रोखला. दुपारी 12 वाजल्यापासून शेतकरी शंभू हद्दीजवळ रेल्वे ऊळावर ठाण मांडून होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु, शेतकरी बॅरिकेड्स तोडून ऊळावर बसले. नवदीप सिंग, अनिश खतकर, गुरकीरत सिंग या शेतकरी आंदोलकांना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत न सोडल्यास बुधवारी सकाळी शंभू सीमेवरील रेल्वेमार्ग रोखून धरण्यात येईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चातर्फे देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी रेल्वे रोखण्यात आल्या. तसेच आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आगामी काळात हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या जाहीर सभा घेण्याचीही तयारी करण्यात आली आहे.