शहरातील आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू
कोल्हापूर :
शहरात मंगळवार आणखी एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल केलें होते. त्यांची कोरोनाची तपासणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली. सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी पाचगाव येथील वृद्धेचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला हेंता. या यापाठोपाठ आता आणखी एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मंगळवारी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यामध्ये 33 वर्षीय पुरूष व 26 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोन्ही रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. यापैकी एक रूग्ण मार्केट यार्ड परिसरातील आहे. दोघांनाही खोकला व निमोनियाची लक्षणे होती. दोघांचेही स्वॅब तपासले असता,त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दोघांवरही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार सुरू असुन प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सद्यस्थितीत कोरोनाचे एकूण 16 रूग्ण सापडले आहेत. यापैकी 11 रूग्ण महापालिका क्षेत्रातील व 3 रूग्ण ग्रामीण भागातील व 2 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. यातील 7 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.