पुन्हा एकदा दूध दरवाढीचे संकेत
जून महिन्यातच राज्य सरकारने केली होती दरवाढ
प्रतिनिधी/ बेंगळूर
यंदा जून महिन्यात राज्य सरकारने नंदिनी दूध दरात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा दूध दरवाढ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी मागणी येथील एका कार्यक्रमात याविषयी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला पुन्हा एकदा धक्का बसवण्याची शक्यता आहे.
रामनगर जिल्ह्याच्या मागडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, नंदिनी दूर दरवाढीचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. यावेळी दरवाढ करून थेट शेतकऱ्यांना प्रोत्साहनधन स्वरुपात देण्यात येईल. दरवाढीसंबंधी बैठक बोलावून चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर मिळणार असली तरी ग्राहकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.
राज्य सरकारने जून महिन्यात नंदिनी दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली होती. आता मुख्यमंत्र्यांनीच दूध दरवाढीचा प्रस्तावर सरकारजवळ असून दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सहा महिन्याच्या आत पुन्हा एकदा दूध दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निजदवर टीका
दरम्यान, दूध दरवाढीला विरोध करणाऱ्या निजद नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी शरसंधान साधले. तुम्ही (निजद नेते) स्वत:ला भूमिपूत्र म्हणवून घेता. मात्र, तुम्ही कोणत्या तरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केला आहात का? काहीही न करता भूमिपूत्र म्हणवून घेत आहात. आम्ही दूध दर वाढवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही विरोध करत आहात, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली.