हिजबुल्लाचा आणखी एक म्होरक्या ठार
इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरुच, 22 ठार
► वृत्तसंस्था / जेरुसलेम
लेबनॉनमध्ये सक्रिय असणारा हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा आणखी एक म्होरक्या इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला आहे. अरेब अल् शोगा असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी इस्रालयने केलेल्या वायुहल्ल्यात तो ठार झाला असून अशाप्रकारे ठार झालेला तो या संघटनेचा नववा म्होरक्या आहे. शोगा हा हिजबुल्लाच्या रणगाडा विरोधी दलाचा नियंत्रक होता. या संघटनेच्या राडवान दलाचे उत्तरदायित्व त्याच्यावर होते, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप हिजबुल्लाने तो ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरुच ठेवले असून शुक्रवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेच्या स्थानांनाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात हिजबुल्लाचे 22 हस्तक मारले गेले आहेत.
गुरुवारी इस्रायलने बैरुटच्या मध्य भागात मोठा हल्ला चढविला होता. या हल्ल्यातून हिजबुल्लाचा एक म्होरक्या बचावल्याचे वृत्त देण्यात आले होते. या म्होरक्याच्या बंकरवर अचूक हल्ला करण्यात आला होता. तथापि, तो निसटण्यात यशस्वी ठरला. इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवले असून या संघटनेचे बरेचसे शस्त्रसामर्थ्य आता संपले आहे, असे प्रतिपादन इस्रालयने केले आहे.
सर्वात घातक हल्ला
शुक्रवारी बैरुटवर इस्रायलने केलेला हल्ला हा या वर्षभराच्या संघर्षातील सर्वात घातक होता, असा आरोप लेबनॉन प्रशासनाने केला आहे. या हल्ल्यात अनेक जण ठार झाले. त्यांच्यात सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यात नागरी इमारतींना लक्ष्य करण्यात आले होते. दोन निवासी इमारती पूर्णपणे नष्ट झाल्या असून त्यांच्या ढिगाऱ्यांखाली अनेकजण अडकलेले असण्याची शक्यता आहे. वाकीफ साफा या हिजबुल्लाच्या म्होरक्याला मारण्याचा प्रयत्न इस्रायलने केला. तथापि, तो या दोन इमारतींमध्ये नव्हता, असा दावा करण्यात आला.
युएन शांतीसेना लक्ष्य
संयुक्त राष्टसंघाने लेबनॉनमध्ये शांतीसेना ठेवलेली आहे. या सेनेचे मुख्यालय बैरुटमध्ये आहे. या मुख्यालयात हिजबुल्लाचे हस्तक आणि काही म्होरके लपलेले आहेत, असे इस्रायलचे म्हणणे होते. त्यामुळे या मुख्यालयावर हल्ले करण्यात येत आहेत. मात्र हे हल्ले हेतुपुरस्सर आहेत, असा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला.
अमेरिकेकडून चिंता व्यक्त
संयुक्त राष्ट्रसंघ शांतीसेनेच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यांमुळे अमेरिका व्यथित झाली आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. इस्रायलने शांतीसेनेच्या पायाभूत सुविधांना लक्ष करु नये. तसे केल्यास या भागातला तणाव अधिक वाढणार आहे. लेबनॉनमध्ये शांतीसेनेचे 1 हजारांहून अधिक सैनिक असून ते विविध देशांचे आहेत. त्यांचे जीव धोक्यात आल्यास या संघर्षाला वेगळे वळण लागेल. त्यामुळे सर्व संबंधितांनी संयम बाळगावयास हवा, असे आवाहन अमेरिकेने पेले आहे.