निपाणीत पुन्हा दिवसाढवळ्या घरफोडी
20 लाखांच्या दागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला : वाढत्या चोरीसत्रामुळे नागरिकांत भीती
निपाणी : निपाणी शहरात चोरीचे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती निर्माण झाली असून सोमवारी भरदिवसा दुपारी 12 वाजता चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून सुमारे 18 तोळे सोने व रोकड असा सुमारे 23 लाखांचा ऐवज लंपास केल्याने शहर व उपनगरात एकच खळबळ उडाली आहे. गत पाच दिवसांत अष्टविनायक नगर, पंतनगर व बिरोबा माळनजीक चोरीच्या घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सुनील वडगावे असे चोरी झालेल्या बंगला मालकाचे नाव आहे.
सुनील वडगावे यांचा बिरोबा माळनजीक बंगला आहे. ते रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. याचदरम्यान दुचाकीवरून तिघे युवक हत्यार घेऊन आले. एकट्याने बंगल्याच्या गेटवरून आत प्रवेश केला. एकटा गेटजवळ थांबला तर तिसरा दुचाकीकडे थांबला होता. चोरट्याने गेटवरून प्रवेश करून तिजोरीतील सुमारे 18 तोळे सोने व रोकड बघता-बघता बंगल्याबाहेर घेऊन आला. ही घटना येथील नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी हत्यारे दाखवून तेथून पळ काढला.
दिवसाढवळ्या बंगल्यात घुसून चोरी करणारे सदर चोरटे दुचाकीवरुन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनासंदर्भात पोलिसांनी येथील परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.
श्वानपथकालाही पाचारण
या घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित बेळगाव येथील श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान श्वान परिसरात घुटमळून परत घटनास्थळी आले. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या आठवड्यातही चोरीची घटना
गेल्या बुधवार दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास येथील अष्टविनायक नगर येथे चोरट्यांनी माजी सैनिकाचा बंद बंगला फोडून सुमारे 28 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. चोरट्यांनी येथून 22 तोळे सोने, अर्धा किलो चांदी तसेच 25 हजाराची रोकड असा एकूण 28 लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. या घटनेचा तपास लागलेला नसताना आता चोरीची दुसरी घटना घडली आहे.