पश्चिम बंगाल सरकारला पुन्हा दणका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. या भीषण घटनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याची न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. या सुटकेच्या विरोधात राज्य सरकारने सादर केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला दिलासा मिळाला आहे.
सारा देश हादरविलेल्या या घटनेच्या विरोधात सयान लाहरी नामक विद्यार्थ्याने प्रखर आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तो स्वत: या आंदोलनाचा अयोजक होता. त्याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती. पश्चिम बंग छात्र समाज या विद्यार्थी संघटनेचा लाहरी हा नेता आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने जामीनासाठी आवेदनपत्र सादर केले होते. त्याचा जामीनाचा अर्ज प्रथम कनिष्ठ न्यायालयाने नाकारला होता मात्र, नंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने त्याची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका सादर केली होती. या याचिकेवर निर्णय देण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळत असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या शुक्रवारच्या आदेश
सयान लाहरी यांची जामीनावर सुटका केली जावी, असा आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दिला होता. त्याची सुटका केल्यास आंदोलन पुन्हा भडकेल आणि राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण दाखवत पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. लाहरी याला 27 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. लाहरी याची आई अंजनी यांनी कलकता उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.