अरविंद केजरीवालांना आणखी एक धक्का; स्वीय सचिव बिभव कुमार बडतर्फ
स्वीय सचिव बिभव कुमार बडतर्फ : दक्षता विभागाची कारवाई
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी तिहार तुऊंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव (पीए) बिभव कुमार यांच्यावर दक्षता विभागाने मोठी कारवाई करत त्यांना पदावरून हटवले आहे. दक्षता संचालनालयाने 10 एप्रिलपासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांची सेवा समाप्त केली आहे. दोन दिवसांपूर्वीच बिभव कुमार यांनी तिहार तुऊंगात केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी 8 एप्रिल रोजी दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बिभव कुमारची चौकशी केली होती. दक्षता विभागाने अरविंद केजरीवाल यांचे पीए म्हणजेच खासगी सचिव बिभव कुमार यांची नियुक्ती अयोग्य मानली आहे. बिभव कुमारच्या नियुक्तीसाठी निर्धारित प्रक्रिया आणि नियमांचे काटेकोर पालन न झाल्याने त्यांची नियुक्ती बेकायदेशीर व अवैध ठरविण्यात येत असल्याचे दक्षता विभागाचे विशेष सचिव राजशेखर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला आणि कामात अडथळा आणल्याबद्दल बिभव कुमार विऊद्ध 2007 मध्ये प्रलंबित असलेल्या कायदेशीर खटल्याचाही या आदेशात उल्लेख आहे.