For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमवारी आणखी एका काळविटाचा मृत्यू

01:04 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
सोमवारी आणखी एका काळविटाचा मृत्यू
Advertisement

मृत्युमुखी पडलेल्या काळविटांची संख्या 31 वर , 7 काळविटांवर उपचार सुरू

Advertisement

बेळगाव : भुतरामहट्टीतील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील काळविटांच्या मृत्युमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काळविटांच्या मृत्यूचा फेरा सुरूच असून सोमवार दि. 17 रोजी पहाटे 5 वा. आणखी एका काळविटाचा उपचाराचा उपयोग न झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या काळविटांची संख्या 31 वर पोहोचली असून 7 काळविटांवर उपचार सुरू आहेत. राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील काळविटांची 13 नोव्हेंबरपासून मृत्यू होण्याची मालिका सुरू झाली आहे. एका पाठोपाठ एक काळविट मृत्युमुखी पडत असल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वनखाते, त्याचबरोबर प्राणी संग्रहालयातील डॉक्टरांचे या घटनेमुळे धाबे दणाणले आहेत. गुरुवार दि. 13 नोव्हेंबरपासून रविवार दि. 16 नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत 30 काळविट दगावल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी बजावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे.

काळविटांवर उपचार करण्यासाठी बनेरघट्टा उद्यानातील दोन तज्ञ 

Advertisement

डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते.त्यांच्याकडून 8 अत्यवस्थ काळविटांवर उपचार करण्यात येत होते. मात्र त्यापैकी एका काळविटाचा सोमवार दि. 17 रोजी पहाटे पाचच्या दरम्यान मृत्यू झ्ा़ाला आहे. बनेरघट्टा येथील तज्ञ डॉक्टर पुन्हा बनेरघट्ट्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे पशुसंगोपन खात्याच्या काकती सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्य डॉ. चंद्रू व त्यांच्या सहकाऱ्यांकडून काळविटांवर उपचार सुरू आहेत. बनेरघट्टा येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक पुन्हा मंगळवार दि. 18 रोजी बेळगावला परतणार आहे. मृत्युमुखी पडलेल्या काळविटांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मंगळवार दि. 18 रोजी उपलब्ध होणार आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीदेखील ही बाब गांभीर्याने घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावला आहे.

आजूबाजूच्या गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करा

भुतरामहट्टीच्या राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील काळविटांचा मृत्यू होत आहे. तज्ञ पशूवैद्यांनी मृतदेहांची तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार हे मृत्यू ‘हेमोरेजीक सेप्टिसेमिया’ या विषाणूजन्य संसर्गामुळे झाल्याचा संशय आहे. हा आजार संसर्गजन्य असून इतर शाकाहारी प्राण्यांनाही याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार रोखण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगाव विभागाच्या उपवन संरक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा पशूसंगोपन व पशूवैद्यकीय सेवा खात्याच्या उपसंचालकांना केली आहे.

आतापर्यंत 31 काळविटांचा मृत्यू

राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील काळविटांचा मृत्यू होत असल्याने बनेरघट्टा येथील तज्ञ डॉक्टरांकडून काळविटांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर पशुसंगोपन खात्याच्या स्थानिक डॉक्टरांकडूनही उपचार केले जात आहेत. सोमवारी पहाटे आणखी एका काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने मृत्युमुखी पडलेल्या काळविटांची संख्या 31 वर पोहोचली आहे. 7 काळविटांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

-नागराज, एसीएफ बेळगाव

Advertisement
Tags :

.