कंग्राळी बुद्रुक येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील विश्व भारत सेवा समिती संचलीत माध्यमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूलच्या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडास्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत सदस्य दादासाहेब भदरगडे, उद्योजक किरण तरळे उपस्थित होते. प्रारंभी क्रीडा शिक्षक एस. आय. माडुळकर यांनी प्रास्ताविक केले तर गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. के. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन स्वागत केले. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. हुलगबाळी यांच्या हस्ते मान्यवरांचे हार व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी किरण तरळे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन, विजय नंदिहळ्ळी यांच्या हस्ते ध्वजारोहण, दादासाहेब भदरगडे यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच दररोजच्या जीवनामध्ये खेळ खेळणेही गरजेचे आहे. शिक्षण आणि खेळ या नाण्याच्या दोन बाजु आहेत. शरीर संपदा हीच खरी संपत्ती आहे, असे विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही विद्यालयाच्या शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले. जी. डी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर आर. पी. पाटील यांनी आभार मानले.