हणकोणचे जागृत देवस्थान श्री सातेरी देवीचा वार्षिकोत्सव उद्यापासून
कारवार : कारवार तालुक्यातील हणकोण येथील सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सातेरी देवीच्या नव्याचा वार्षिकोत्सव मंगळवार दि. 10 पासून सोमवार दि. 16 पर्यंत होणार आहे, अशी माहिती श्री सातेरीदेवी (कुलदेवता) चबकादेवी मंदिर समितीचे अध्यक्ष उल्हास नाईक, उपाध्यक्ष उदय एम. गांवकर आणि सेक्रेटरी धीरज नाईक यांनी दिली आहे. नवसाला हमखास पावणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सातेरी देवीच्या उत्सवाच्या दरम्यान खास वैशिष्ट्या म्हणजे, मंदिराच्या गर्भगुढीचा दरवाजा वर्षातून केवळ सात दिवस उघडला जातो. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी, ओटी भरण्यासाठी, साकडे घालण्यासाठी, नवस फेडण्यासाठी आणि तुलाभारसाठी लाखो भाविकांची गर्दी लोटलेली असते.
यामध्ये कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश असतो. वार्षिकोत्सवाची सुरुवात मंगळवारी मध्यरात्री गाभाऱ्याचा दरवाजा उघडल्यानंतर देवीला नवे अर्पण करून होणार आहे. दि. 11 रोजी उत्सवाचा दिन कुळावी कुटुंबीयांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्या दिवशी दुपारी 4वाजता कुळावी बांधवांकडून देवीला तळई आणि कुळावी कुमारीका व नववधुच्यांकडून अडेकी अर्पण करण्याचा धार्मिक विधी होणार आहे. दि. 12 पासून 16 पर्यंत मंदिर सर्वांसाठी खुले केले जाणार असून सर्व भाविकांकडून फळफळावळ, ओटी, साकडे, नवस, तुलाभार आदी सेवा स्वीकारल्या जाणार आहेत. या सर्व सेवांना सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे.
भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
दि. 13 पासून दि. 16 पर्यंत असे सलग 4 दिवस सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 पासून दि. 15 पर्यंत असे सलग 4 दिवस संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 रोजी अवरसा (ता. अंकोला) येथील गजानन भजनी मंडळाचा, दि. 13 रोजी सदाशिवगड येथील ओंकार संगीत सेवा मंडळाचा, दि. 14 रोजी काणकोण (गोवा) येथील भक्तीभजनी मंडळाचा आणि दि. 15 रोजी हणकोण येथील रामदास रायकर आणि मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. 16 रोजी संध्याकाळी 5 वाजता गर्भगुढीचा दरवाजा बंद केला जाणार आहे. त्याचबरोबर उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून देवीच्या कृपाप्रसादाला पात्र व्हावे, असे आवाहन मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.