15 ऑगस्टला ट्रॅक्टर रॅलीची घोषणा
नव्या फौजदारी कायद्यांना विरोध : दिल्लीच्या दिशेने कूच करणार शेतकरी संघटना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आता दिल्लीच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी शेतकरी संघटनांकडून देशभरात टॅक्टर रॅलीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना संघू आणि शंभू समवेत दिल्लीनजीकच्या सीमेवर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रॅक्टर रॅलीसोबतच नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रतींना देखील जाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 ऑगस्ट रोजी शेतकरी संघटना एमएसपीवर कायदेशीर हमीसाठी जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी निदर्शने करणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी पूर्ण देशात ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्याची रणनीति शेतकरी संघटनांनी तयार केली आहे. यादरम्यान नव्या फौजदारी कायद्यांची प्रत जाळली जाणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या धोरणांना विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर शंभू बॉर्डरवल शेतकरी अनेक महिने पुरेल इतके धान्य घेऊन पोहोचू लागले आहेत.
पंजाबमधील शेतकरी संघटना दीर्घकाळापासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून आहेत. 31 ऑगस्ट रोजी या धरणे आंदोलनाला 200 दिवस पूर्ण होणार आहेत. शेतकरी संघटनांनी त्यादिवशी सर्व शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. तर हरियाणातील जिंद येथे 15 सप्टेंबर तर पीपलीमध्ये 22 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांची रॅली आयोजित होणार आहे. शेतकरी संघटनांनी माजी केंद्रीयमंत्री अजय टेनी यांचे पुत्र आशीष मिश्रा यांना जामीन मंजूर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची निंदा केली आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्वत:च्या एका निर्णयात एक आठवड्याच्या आत शंभू बॉर्डर खुली करण्याचा आदेश दिला होता. याची मुदत 17 जुलै रोजी संपुष्टात आली आहे. परंतु यापूर्वीच हरियाणा सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एमएसपीच्या कायदेशीर हमीसमवेत सुमारे 12 मागण्यांसह 13 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली होती. परंतु हरियाणा सरकारने पतियाळा आणि अंबालादरम्यान शंभू बॉर्डरवर मार्ग रोखला होता. तेव्हापसून शेतकरी संघटना शंभू बॉर्डरवर ठाण मांडून आहेत.