शिमगोत्सव, कार्निव्हाल, शिवजयंतीची घोषणा
आयोजन समित्यांना भरघोस निधी : बक्षिसांच्या रकमेतही भरीव वाढ
- कार्निव्हाल : 10 ते 13 फेब्रुवारी
- शिवजयंती : 19 फेब्रुवारी
- शिमगोत्सव : 26 ते 8 एप्रिल
पणजी : राज्यात 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कार्निव्हल तर, 26 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत 18 ठिकाणी शिमगोत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे, तसेच 19 फेब्रुवारी रोजी डिचोलीत शिवजयंती होणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. पर्यटकांचे आकर्षण बनलेला कार्निव्हल आणि गोव्याची भव्य संस्कृती दाखवणारा शिमगोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती सोहळा यांच्या तारखा मंत्री खंवटे यांनी जाहीर केल्या आहेत. काल शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत खात्याचे अधिकारी, पणजीचे महापौर, विविध पालिकांचे नगराध्यक्ष उपस्थित होते.
कार्निव्हल मिरवणुकीस 20 लाख
कार्निव्हलची सुऊवात 10 फेब्रुवारी रोजी पणजी येथून होईल. त्यानंतर 11 रोजी मडगाव, 12 रोजी वास्को तर 13 रोजी म्हापसा येथे कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणच्या आयोजकांना 20 लाख ऊपये देण्यात येणार आहेत. कार्निव्हल मिरवणुकीत पारंपरिक गोष्टींवर भर देण्यात येणार आहे.
शिवजयंतीसाठी पाच लाख
19 फेब्रुवारी रोजी डिचोली येथे दुपारी 4 वाजता शिवजयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच पणजी, मडगाव, म्हापसा, मुरगाव, फोंडा आणि सांखळी येथेही fिशवजयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी पालिकांना 5 लाख ऊपये निधी देणार आहेत.
शिमगोत्सव बक्षिसांत वाढ
शिमगोत्सवाच्या मिरवणुका 26 मार्चपासून फोंडा येथून सुरू होतील. 8 एप्रिलपर्यंत राज्यातील 18 ठिकाणी या चित्ररथ मिरवणुका होतील. याचे वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर होईल. शिमगोत्सवसाठी यंदा बक्षीस रक्कम तसेच मदत निधी वाढविण्यात आला आहे. चित्ररथाची आणि रोमटामेळाची बक्षीस रक्कम वाढवून 75 हजार ऊपये करण्यात आली आहे. पारंपरिक नृत्याची बक्षीस रक्कम वाढवून 25 हजार ऊपये केली आहे. पणजीतील शिमगोत्सव आयोजनासाठी यंदा 25 लाख ऊपये देण्यात येतील. मडगाव, वास्को, फोंडा आणि म्हापसा येथील आयोजनासाठी यावर्षी 15 लाख ऊपये देण्यात येतील. इतर लहान शहरांमध्ये आयोजनासाठी 10 लाख ऊपये देण्यात येतील.