डेन्मार्कच्या राणीकडून पद सोडण्याची घोषणा
52 वर्षांपर्यंत सांभाळली जबाबदारी : पुत्राला सोपविणार राजघराण्याचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ कोपनहेगन
डेन्मार्कच्या महाराणी माग्ररेथ द्वितीय यांनी रविवारी रात्री उशिरा पद सोडण्याची घोषणा केली आहे. 14 जानेवारी रोजी मी माझे पद सोडणार आहे. पुत्र तसेच युवराज फ्रेडरिक आंद्रे हेन्रिकला राजघराण्याचे नेतृत्व सोपविणार असल्याचे माग्ररेथ द्वितीय यांनी स्वत:च्या संबोधनात नमूद केले आहे. कर्तव्याप्रति दीर्घकालीन समर्पणासाठी महाराणी माग्ररेथ द्वितीय यांचे डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी आभार मानले आहेत.
क्वीन माग्ररेथ द्वितीय यांनी 14 जानेवारी 1972 रोजी पिता किंग फ्रेडरिक नववे यांच्या निधनानंतर सिंहासन सांभाळले होते. माग्ररेथ द्वितीय या 52 वर्षांनी हे पद सोडणार आहेत. ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर महाराणी माग्ररेथ द्वितीय या युरोपमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या दुसऱ्या शासक म्हणून ओळखल्या जातात.
83 वर्षीय महाराणी माग्ररेथ यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासूनच पद सोडण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला होता. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर भविष्याविषी विचार करण्यासाठी मला वेळ मिळाला. स्वत:च्या मुलाला मुकुटाची जबाबदारी सोपविण्याची वेळ आता आल्याचे वाटले. 14 जानेवारी रोजी पद सोडण्याची आणि मुलाला जबाबदारी सोपविण्याची योग्य वेळ असल्याचा मी निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डेन्मार्कचे युवराज फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक अणि युवराज्ञी मेरी एलिझाबेथ हे फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान ताजमहाल तसेच आग्रा किल्ल्याला भेट दिली होती.