गोकाक जिल्ह्याची घोषणा करा
तालुक्यातील सर्वपक्षीय नेते-मठाधीशांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : याच अधिवेशनाच्या काळात स्वतंत्र गोकाक जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी गोकाक येथील सर्वपक्षीय नेते व मठाधीशांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी, अशोक पुजारी, राहुल जारकीहोळी, सर्वोत्तम जारकीहोळी यांच्यासह गोकाक तालुक्यातील विविध मठाधीशांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कायदा व संसदीय मंत्री एच. के. पाटील, मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, भैरती सुरेश आदी नेतेही उपस्थित होते.
18 आमदारांची बैठक घेणार
मुख्यमंत्र्यांनी गोकाक तालुक्यातून आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्व 18 आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा विभाजनावर निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. याच अधिवेशनाच्या काळात बैठक घेऊन योग्य निर्णय जाहीर करण्याची मागणी गोकाक तालुक्यातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील
पत्रकारांशी बोलताना भालचंद्र जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री यासंबंधी लवकरच निर्णय घेतील, अशी आशा बोलून दाखवली. चिकोडी जिल्ह्याचीही मागणी आहे. प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना आपला तालुका जिल्हा व्हावा, अशी अपेक्षा असणे साहजिक आहे. गोकाक जिल्ह्यासाठी तब्बल 40 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. सरकारने गोकाक जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी आहे. पालकमंत्र्यांनाही निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.