सहा महिन्यात बागायती पिकांची नुकसानभरपाई
बागायत मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांची माहिती : सर्व्हे करण्यासाठी अर्थखात्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी
बेळगाव : यंदा राज्यातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागू नये यासाठी पीक नुकसान सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकसानभरपाईचे कार्य महसूल खात्याच्या अखत्यारित आहे. कृषी पिकांचा सर्व्हे झाला असून बागायत पिकांच्या सर्व्हेसाठी विलंब होत आहे. मात्र महसूल व बागायत खात्याच्या समन्वयातून 6 महिन्याच्याआत सर्व्हेचे काम पूर्ण करून नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे आश्वासन बागायत मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी विधानपरिषदेला दिले.
शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी राज्य सरकार अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी लागलीच नुकसानभरपाई आल्यानंतर सदर पैसे एकतर कर्जाची फेड करण्यासाठी वापरतील किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी गुंतवणूक करतील. मात्र अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने ते चिंतेत आहेत. त्यांची चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मधुगौडा यांनी केली.
सर्व्हेचे काम जानेवारी महिन्यापासून
बागायत पिकांचा सर्व्हे करण्यासाठी ठराविक कलावधीची आवश्यकता असते. सर्व्हेचे काम जानेवारी महिन्यापासून मेपर्यंत चालते. सध्या बागायत पिकांमध्ये जाण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने सर्व्हेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. राज्यातील काही भागात सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणी जानेवारीपासून सर्व्हेचे काम हाती घेण्यात येणार आहे. नुकसानभरपाईचे काम महसूल खात्याच्या अखत्यारित असल्याने नुकसानभरपाईचे काम त्यांनी सुरू केले आहे. सर्व्हे करण्यासाठी अर्थखात्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून महसूल व बागायत खात्याच्या समन्वयातून 6 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे बागायत मंत्री मल्लिकार्जुन यांनी सांगितले.