For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बेळगाव सस्पेंस ; चिकोडीत जोल्ले

06:28 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव सस्पेंस   चिकोडीत जोल्ले

भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील 20 जण : 10 विद्यमानांना संधी : नऊ जणांचा पत्ता कट

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीसाठी हालचाली गतीमान केल्या आहेत. दरम्यान, भाजपने बुधवारी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून राज्यातील 28 पैकी 20 मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. चिकोडी-सदलगा लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनाच तिकीट देण्यात आले आहे. मात्र, तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या बेळगाव मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपच्या दुसऱ्या यादीत 10 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली असून 9 खासदारांचे तिकीट कापले आहे.

Advertisement

भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील एकही मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला नव्हता. तर दुसऱ्या उमेदवार यादीत 20 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सोमवारी रात्री नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत तोलून-मापून उमेदवार निवडण्यात आले. असून नऊ विद्यमान खासदारांना वगळण्यात आले असून यात संगण्णा करडी (कोप्पळ), देवेंद्रप्पा (बळ्ळारी), डी. व्ही. सदानंदगौडा (बेंगळूर उत्तर), प्रतापसिंह (म्हैसूर), जी. एम. सिद्धेश्वर (दावणगेरे), जी. एस. बसवराज (तुमकूर), नलीनकुमार कटील (मंगळूर), श्रीनिवास प्रसाद (चामराजनगर), शिवकुमार उदासी (हावेरी) यांचा समावेश आहे. दावणगेरेतून खासदार सिद्धेश्वर यांच्या पत्नी गायत्री सिद्धेश्वर यांना भाजपने तिकीट दिले आहे. तर शिवकुमार उदासी व श्रीनिवास प्रसाद यांनी आधीच माघार घेतल्याने तेथे नवे उमेदवार देण्यात आले आहेत.

Advertisement

सदानंदगौडांना धक्का

मुख्यमंत्रिपद, केंद्रीय मंत्रिपद सांभाळलेल्या डी. व्ही. सदानंदगौडा यांना धक्का बसला असून त्यांच्या मतदारसंघात केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांना उतरविण्यात आले आहे. तर शोभा करंदलाजे यापूर्वी निवडून आलेल्या उडुपी-चिक्कमंगळूर मतदारसंघात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी यांना संधी देण्यात आली आहे.

म्हैसूरमध्ये वडेयर राजघराण्यातील व्यक्तीला तिकीट

धारवाडमध्ये प्रल्हाद जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार बसवराज बोम्माई यांना हावेरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांना तुमकूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे म्हैसूरचे खासदार प्रतापसिंह यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी म्हैसूर वडेयर राजघराण्याचे यदूवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांना निवडणूक आखाड्यात उतरविण्यात आले आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या बळापुढे त्यांचा कस लागणार आहे.

शिमोगा, दावणगेरे बंडखोरी?

माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आपले पुत्र कांतेश यांना हावेरी किंवा गदगमधून तिकीट द्यावे, अशी मागणी हायकमांडकडे केली होती. जर मुलाला तिकीट न मिळाल्यास शिमोग्यातून बंडखोरीचे निशाण हाती घेण्याचा इशारा दिला होता. हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना तिकीट मिळाल्याने ईश्वरप्पा नाराज आहेत. दुसरीकडे दावणगेरेतून जी. एम. सिद्धेश्वर यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला तिकीट देऊ नये, अशी मागणी माजी मंत्री रेणुकाचार्य यांनी केली होती. परंतु, सिद्धेश्वर यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे रेणुकाचार्य कोणती भूमिका घेतात, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

‘बेळगाव’विषयी सस्पेंस कायम

बेळगाव मतदारसंघातून कोणाला तिकीट द्यावे, याबाबत भाजप हायकमांड स्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. बेळगावच्या विद्यमान खासदार मंगला अंगडी यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे येथे कोणाला तिकीट मिळणार, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अन् काही महिन्यात पुन्हा भाजपात आलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा आहे. मात्र, ते स्थानिक नेते नसल्याने इतर नावांचीही चाचपणी केली जात आहे.

कारवार मतदारसंघाविषयी कुतूहल

कारवार लोकसभा मतदारसंघाविषयी देखील कुतूहल कायम आहे. येथील भाजपचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना यावेळी पुन्हा तिकीट मिळणार की नाही, याविषयी चर्चा रंगली आहे. अनंतकुमार हेगडे यांना डावलले तर विश्वेश्वर हेगडे-कागेरी, माजी आमदार रुपाली नाईक, गोपाळ हेगडे यांच्यापैकी एकाला तिकीट मिळू शकेल. मराठीबहुल भाग असलेल्या खानापूर तालुक्यातील गावे कारवार लोकसभा मतदारसंघात येत असल्याने या भागातील व्यक्तीला तिकीट द्यावे, अशी मागणीही होत आहे.

मतदारसंघ     उमेदवार

चिकोडी            अण्णासाहेब जोल्ले

बागलकोट      पी. सी. गद्दीगौडर

विजापूर           रमेश जिगजिनगी

गुलबर्गा            डॉ. उमेश जाधव

बिदर                 भगवंत खुबा

कोप्पळ            डॉ. बसवराज क्यावतर

बळ्ळारी           बी. श्रीरामुलू

हावेरी                बसवराज बोम्माई

धारवाड            प्रल्हाद जोशी

दावणगेरे                   गायत्री सिद्धेश्वर

शिमोगा           बी. वाय. राघवेंद्र

उडुपी-चिक्कमंगळूर     कोटा श्रीनिवास पुजारी

मंगळूर             कॅ. ब्रिजेश चौटा

तुमकूर             व्ही. सोमण्णा

म्हैसूर               यदूवीर कृष्णदत्त चामराज वडेयर

चामराजनगर         एस. बालराज

बेंगळूर ग्रामीण       डॉ. सी. एन. मंजुनाथ

बेंगळूर उत्तर   शोभा करंदलाजे

बेंगळूर सेंट्रल पी. सी. मोहन

बेंगळूर दक्षिण        तेजस्वी सूर्या

Advertisement
Tags :
×

.