इस्लामपूरात अण्णाभाऊंचा पुतळा राजारामबापू बँकेकडून: आ. जयंतराव पाटील
इस्लामपूर :
इस्लामपूर न्यायालयासमोरील मुख्य चौकातील आयलंडवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य व दिमाखदार पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा राजारामबापू सहकारी बँकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून, यासाठी कोणतीही वर्गणी न घेता स्वनिधीतून खर्च केला जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांनी शुक्रवारी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर दिली.
या निर्णयामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाली असून, नगरपालिका प्रशासकांचाही या निर्णयाला अनुकूल प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
- ठिय्या आंदोलनाचा सकारात्मक शेवट
मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने, कचेरी चौकात पुतळा बसवून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. हा लढा आठव्या दिवशी यशस्वी ठरला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आ. जयंतराव पाटील, समितीचे पदाधिकारी आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तहसीलदार सचिन पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, समितीचे डॉ. विजय चांदणे, शंकरराव महापुरे, प्रा. डॉ. सुभाषराव वायदंडे, डॉ. सुधाकर वायदंडे, नंदकुमार नांगरे, संदीप पाटोळे, उत्तम चांदणे, विनोद बल्लाळ, विकास बल्लाळ, तसेच आंदोलनात जखमी झालेले रामभाऊ देवकुळे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण, व इतर दलित समाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- “कोणाकडे हात पसरणार नाही” – आ. पाटील
आ. जयंतराव पाटील म्हणाले, “राजारामबापू सहकारी बँक आजच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पुतळा उभारणीबाबत अधिकृत पत्र देईल. मंजुरी मिळाल्यानंतर बँक आपल्या स्वनिधीतून हा पुतळा उभारेल. यासाठी कोणाकडे वर्गणी मागणार नाही किंवा कोणताही आर्थिक भार टाकला जाणार नाही.”
- प्रशासकीय मंजुरीनंतर आंदोलन थांबवण्याचा निर्णय
तहसीलदार सचिन पाटील यांनी आ. पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत करून आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले. मात्र समितीचे शंकरराव महापुरे आणि डॉ. विजय चांदणे यांनी स्पष्ट भूमिका घेत,“प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच आंदोलन थांबवले जाईल. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील आणि पुतळा याच ठिकाणीच उभा राहील.” आ. पाटील यांनी या भूमिकेस सहमती दर्शवली.
- मुख्याधिकाऱ्यांशी थेट संपर्क
नगरपालिकेचे मुख्याधिकारी कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे, आ. पाटील यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधून पुतळा उभारणीसंदर्भातील प्रस्तावाबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की,“बँकेच्या वतीने आयलंडच्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी पत्र दिले जाईल. आपण वरिष्ठांशी चर्चा करून मंजुरी द्यावी, म्हणजे कामाची सुरुवात करता येईल.”या चर्चेला मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
- इस्लामपूरकरांच्या मनातली भावना – आ. जयंतराव पाटील
आ. पाटील म्हणाले, “इस्लामपूरकरांच्या मनात अण्णाभाऊ साठ्यांविषयी असलेल्या प्रेमाची आणि श्रद्धेची मला पूर्ण जाणीव आहे. हा पुतळा म्हणजे केवळ स्मारक नव्हे, तर सामाजिक समतेचे प्रतीक ठरेल.”