अॅनाबेल सदरलँडचे जलद द्विशतक
वृत्तसंस्था/ पर्थ
यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाज अॅनाबेल सदरलँडने महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात जलद द्विशतक नोंदविण्याचा पराक्रम केला.
22 वर्षीय सदरलँडने 256 चेंडूत 2 षटकार आणि 27 चौकारांसह 210 धावा झळकाविल्या. सदरलँडने आपले द्विशतक केवळ 248 चेंडूत पूर्ण करताना तिने यापूर्वी म्हणजे 2001 साली कॅरेन रॉल्टनने नोंदविलेला विश्वविक्रम मागे टाकला. रॉल्टनने लिड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 306 चेंडूत द्विशतक झळकाविले होते.
या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 76 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या ब्राऊनने 21 धावात 5, सदरलँडने 19 धावात 3 तर मॅकग्राने 4 धावात 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 251 या धावसंख्येवरुन शुक्रवारी खेळाला पुढे सुरुवात केली. सदरलँड आणि गार्डनर यांनी सहाव्या गड्यासाठी 144 धावांची भागिदारी केली. गार्डनर बाद झाल्यानंतर मॉलिनियुक्सने सदरलँडला बऱ्यापैकी साथ देताना सातव्या गड्यासाठी 86 धावांची भर घातली. मॉलिनिक्सने 4 चौकारांसह 33 तसेच गार्डनरने 9 चौकारांसह 65 धावा जमविल्या.
तत्पूर्वी कर्णधार अॅलिसा हिलीने आक्रमक फलंदाजी करताना 124 चेंडूत 16 चौकारांसह 99 धावा झोडपल्या. हिलीचे शतक केवळ एका धावेने हुकले. सदरलँड आठव्या गड्याच्या रुपात तंबूत परतली. गर्थने 45 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 49 धावा झळकाविल्या. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 575 धावांवर घोषित करुन दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 499 धावांची भक्कम आघाडी मिळविली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 3 बाद 67 धावा जमविल्या. कर्णधार वुलव्हर्ट 8 धावांवर तर लुस 5 धावांवर बाद झाले. बॉश्चला खाते उघडता आले नाही. ब्रिट्स 18 तर टकेर 27 धावांवर खेळत आहे. या सामन्यातील खेळाचे 2 दिवस बाकी राहिले असून यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या धावांनी विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका प. डाव 31.2 षटकात सर्व बाद 76 (लुस 26, क्लास 10, अवांतर 10, ब्राऊन 5-21, सदरलँड 3-19, मॅकग्रा 2-4), ऑस्ट्रेलिया प. डाव 125.2 षटकात 9 बाद 575 डाव घोषित (अॅनाबेल सदरलँड 210, हिली 99, गार्डनर 65, मॉलिनिक्स 33, गर्थ नाबाद 49, किंग 8, अवांतर 26, क्लास 3-85, डी क्लर्क 2-96, ट्रायोन 3-81, टकेर 1-68), दक्षिण आफ्रिका दु. डाव 28 षटकात 3 बाद 67 (ब्रिट्स खेळत आहे 18, टकेर खेळत आहे 27, गॅरेथ 2-8, ब्राऊन 1-18).