‘अन्नभाग्य’ यथ:स्थितीच सुरु राहणार
फूड किट देण्याचा प्रस्ताव मागे : केंद्राकडून अतिरिक्त तांदूळ खरेदी न करण्याचा निर्णय
बेंगळूर : राज्य काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांपैकी महत्त्वाकांक्षी ‘अन्नभाग्य’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अतिरिक्त तांदळाऐवजी रक्कम देणे सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून तांदूळ खरेदी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवाय 5 किलो तांदळाबरोबर ‘फूड किट’ देण्याचा प्रस्तावही सोडून देण्यात आला आहे. गुरुवारी बेंगळुरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाला. बैठकीनंतर कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली.
सध्या जारी असलेल्या अन्नभाग्य योजनेत कोणताही बदल केला जाणार नाही. अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात फूड किट (खाद्यतेल, साखर, मीठ, डाळी व इतर पदार्थ) देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तो सोडून देण्यात आला आहे. लाभार्थ्यांना अतिरिक्त तांदळाच्या मोबदल्यात यापुढेही प्रतिव्यक्ती 170 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. अन्न-नागरी पुरवठा खात्यामार्फत डीबीटी’द्वारे लाभार्थींच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून तांदूळ खरेदी करण्याऐवजी आम्ही अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात लाभार्थींना पैसे देत आहे. या रकमेतून त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास अनुकूल होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोविड गैरव्यवहार : शिफारसींसाठी समिती
मागील भाजप सरकारने कोविड काळात केलेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी न्या. जॉन मायकल कुन्हा यांच्या नेतृत्त्वाखालील आयोगाने सरकारकडे अहवाल दिला आहे. या अहवालाचे विश्लेषण आणि अध्ययन करून पुढील कार्यवाहीविषयी आवश्यक शिफारसी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव एल. के. अतिक यांचा समावेश आहे, अशी माहितीही एच. के. पाटील यांनी दिली.