अनमोल, तान्या आगेकूच, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था / वांता (फिनलंड)
भारताच्या युवा शटलर्स अनमोल खरब आणि तान्या हेमंत यांनी येथे झालेल्या आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रभावी विजय मिळविला. हरियाणाच्या 18 वर्षीय अनमोलने 77 मिनिटांच्या मॅरेथॉन सामन्यात चिनी तैपेईच्या लिन हसियांग टी हिला 23-21, 11-21, 21-18 असे पराभूत करुन दमदार कामगिरी केली. सेलांगोर येथे 2024 मध्ये आशियाई संघ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेली अनमोल पुढील फेरीत चिनी तैपेईच्या वेन चि हसूशी सामना करेल. यावर्षी सायपन इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणाऱ्या 22 वर्षीय तान्याने चीन तैपेईच्या हुआंग चिंग पिंगवर 22-20, 21-18 असा विजय मिळवला. थायलंडच्या द्वितीय मानांकीत रत्चानोक इंथानॉनशी तिची पुढील लढत होईल.
तथापि, कविप्रिया सेल्वमला आठव्या मानांकीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डकडून 16-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनी फ्रान्सच्या लुकास रेनोइर आणि कॅमिल पोगान्ट यांना फक्त 23 मिनिटांत 21-9, 21-7 असे पराभूत करुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तथापि, मोहीत जगलान आणि लक्षिता जगलान यांना नेदरलँड्सच्या ब्रायन वासिंक आणि डेबोरा जिले यांच्याकडून 19-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.