अंकिता, प्रवीण, सीमा यांना रौप्यपदके
विश्व विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धा, भारताला रिलेत कांस्य
वृत्तसंस्था/ रिने-रुहेर-इसेन (जर्मनी)
रविवारी येथे झालेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रवीण चित्रावेल, सीमा तसेच अंकिता ध्यानी यांनी विविध क्रीडा प्रकारात रौप्यपदके मिळविली. भारताच्या पुरुष संघाने रिलेमध्ये कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने एकूण 3 पदकांची कमाई केली. या स्पर्धेमध्ये भारतीय स्पर्धकांनी समाधानकारक कामगिरी करताना एकूण 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्यपदके मिळविली.
रविवारी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी फिल्ड अॅण्ड ट्रॅकमध्ये अनेक भारतीय अॅथलिट्सचा विविध प्रकारात समावेश होता. पण भारताला केवळ 2 पदकांवर समाधान मानावे लागले. 23 वर्षीय महिला धावपटू अंकिता ध्यानीने 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात 9 मिनिटे, 39.00 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात फिनलँडच्या मोनोनेनने 9 मिनिटे, 31.86 सेकंदासह सुवर्ण तर जर्मनीच्या अॅडीया ब•sने 9 मिनिटे, 33.34 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक घेतले.
पुरुषांच्या 4×100 मी. रिले प्रकारात भारताच्या लालुप्रसाद भोई, अनिमेश कुजूर, मनिकांत होबलीधार आणि एम. जयराम यांनी 38.89 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात दक्षिण कोरियाने 38.50 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर दक्षिण आफ्रिकेने 38.80 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक पटकाविले. मात्र महिलांच्या 4×400 मी. रिले प्रकारात भारतीय धावपटूंनी निराशा केली. त्यांना पदक फेरीही गाठता आली नाही. या क्रीडा प्रकारात जर्मनीने सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या पुरुष रिले संघाला 4×400 मी. रिले प्रकारामध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात पोलंडने सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये भारताच्या 24 वर्षीय परविन चित्रावेलने 16.66 मी. ची नोंद करत रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या कॉनर मर्फीने 16.77 मी. ची नोंद करत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या सीमाने 15 मिनिटे, 35.86 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक पटकाविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सीमाचे हे पहिले पदक आहे. या क्रीडा प्रकारात ज्युलिया डेव्हिड स्मिथने सुवर्णपदक मिळविले. जर्मनीतील सहा प्रमुख शहरांमध्ये सदर ही स्पर्धा 16 ते 27 जुलै दरम्यान घेतली गेली. 2023 साली चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने 26 पदकांसह सातवे स्थान मिळविले होते. तर जर्मनीतील या स्पर्धेत भारताने एकूण 11 पदकांची कमाई केली असून त्यापैकी 8 पदके त्यांनी नेमबाजीत मिळविली आहेत.
भारताचे पदक विजेते खेळाडू - परणीत कौर/कुशल दलाल (मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी) सुवर्णपदक, साहिल जाधव (पुरुष कंपाऊंड तिरंदाजी) सुवर्णपदक, परणीत कौर (महिला कंपाऊंड तिरंदाजी) रौप्यपदक, कुशल दलाल/साहिल जाधव/ऋतिक शर्मा (पुरुष सांघिक कंपाऊंड तिरंदाजी) रौप्यपदक, प्रवीण चित्रावेल (पुरुष तिहेरी उडी) रौप्यपदक, सीमा (महिला 5000 मी. धावण्याची शर्यत) रौप्यपदक, अंकिता ध्यानी (महिला 3000 मी. स्टिपलचेस) रौप्यपदक, बॅडमिंटन मिश्र सांघिक कांस्यपदक, वैष्णवी आडकर (महिला एकेरी टेनिस) कांस्यपदक, परणीत कौर/अवनीत कौर/मधुरा धामणगावकर (महिला कंपाऊंड सांघिक तिरंदाजी) कांस्यपदक, सेजल सिंग/मुनिता प्रजापती/मानसी नेगी (महिला 20 कि.मी. चालणे) कांस्यपदक, पुरुष 4×100 मी. रिलेमध्ये कांस्यपदक.