अंजलीची हत्या करणारा गजाआड
दावणगेरेत अटक : रेल्वेत महिलेवर हल्ला, प्रवाशांकडून धुलाई
बेंगळूर : हुबळीच्या वीरापूर गल्लीतील 20 वर्षीय अंजली अंबिगेर हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी गिरीश उर्फ विश्वनाथ सावंत (वय 24) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दावणगेरे येथे रेल्वेमध्ये एका महिलेवर हल्ला करून फरार होण्याच्या प्रयत्नात असताना इतर प्रवाशांनी त्याची यथेच्छ धुलाई करून त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हुबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हुबळीत बुधवारी पहाटे 5:30 च्या सुमारास अंजली अंबिगेरची विश्वनाथ याने चाकूने वार करून भीषण हत्या केली होती. प्रेमाचा प्रस्ताव धुडकावून लावल्याने विश्वनाथने तिची राहत्या घरी झोपेत असताना हत्या केली. हत्येनंतर तो फरार झाला होता. तो हुबळी नव्या बसस्थानकावरून हावेरीला गेला. तेथून रेल्वेने म्हैसूरला गेला. तेथे काम करत असलेल्या महाराजा हॉटेलमध्ये त्याने बुधवारची रात्र घालवली. त्यानंतर त्याने पोलिसांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. म्हैसूरहून अरसीकेरे येथे येऊन त्याने विश्वमानव एक्स्प्रेसचे तिकीट काढले. सामान्य बोगीतून प्रवास करताना त्याने तुमकूरहून पतीसमवेत गदगला निघालेल्या महिलेची छेड काढली. स्वच्छतागृहात जात असताना पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या महिलेने विश्वनाथला शिवीगाळ केली. त्यावेळी त्याने त्या महिलेच्या पोटात चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार चुकविण्याच्या प्रयत्नात महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर प्रवाशांनी विश्वनाथला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर दावणगेरे येथे रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.
रेल्वे पोलिसांनी हुबळी पोलिसांना दिली माहिती...
चौकशी केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी हुबळी पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले. प्रवाशांनी केलेल्या धुलाईमुळे जखमी झालेल्या विश्वनाथला हुबळीच्या किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चाकूहल्ल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा पती महांतेश सवटूर याने तक्रार नोंदविल्याने रेल्वे पोलिसांनी विश्वनाथविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.