For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राण्यांचे स्वयंवर...ice praposal...

06:16 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्राण्यांचे स्वयंवर   ice praposal
Advertisement

उत्तरार्ध

Advertisement

अशा सगळ्या पांढऱ्या शुभ्र वातावरणात एकदम आपलं लक्ष वेधलं जातं. लांब कुठेतरी काळ्या रंगाचे कोट घातलेले वकिलांचं संमेलन असावं असं आपल्याला दिसतं. या ठिकाणी लगबगीने चालत येणारे पेंग्वीन आपल्याला दिसतात. आणि मध्येच चालता चालता आकाशाकडे बघत आपले पंख फडफडत पुढे निघतात. काहीतरी ऑर्ग्युमेंट केल्यासारखे इकडे तिकडे बघत बोलत असतात. पण त्यांची दुडकी चाल आणि लगबग पाहिल्यानंतर खूप गंमत वाटते. इथे आल्यानंतर समुद्रकिनारी मोठ्ठं संमेलन असावं असंच आपल्याला वाटतं. ही जत्रा भरल्यानंतर एक विशेष प्रकारच्या आवाजाने आसमंताचे पटल भरून राहते आणि मग लक्षात येतं बऱ्याच ठिकाणी आकाशाकडे नजर लावून कंबरेवर हात ठेवून उभी असलेली वधू आणि तिच्याभोवती घिरट्या घालणारा किंवा तिच्याभोवती फिरणारा पेंग्वीन लग्नाच्या प्रपोजलसाठी आलेला असतो. एखाद्या सौंदर्यवतीच्या स्पर्धेत उभे राहावं अशी ती मादी पेंग्वीन उभी असते. आणि तिच्यासमोर तिथल्याच बर्फाचा गोळा करून अतिशय अदाकारीने ठेवणारा पेंग्वीनही दिसतो. ज्या पेंग्वीनची अदा तिला जास्त आवडेल त्याला ती आपली सहचर म्हणून निवडते आणि मग त्याच्यामागे लगबगीने चालायला लागते. दोघे मिळून तुरुतुरु चालत पाण्यामध्ये जलविहारासाठी निघून जातात. तिथेच त्यांचं सहजीवन सुरू होतं. अशा या लग्नाच्या संमेलनामध्ये वधू-वर यांचे आई-वडील नसतात, देण्याघेण्याची बोलणी नसते, बस्ता नसतो किंवा चहा पोहेदेखील नसतातच. ज्यांनी त्यांनी आपल्या जोडीदार शोधायचा आणि आपलं जीवन व्यतीत करायचं हे अलिखितपणे ठरलेलंच असतं. इथे आई-वडील किंवा मुलगा हे आपल्याला ओळखूच येत नाहीत. कारण सगळेच एकसारखे दिसतात. कोण कोणाचा बाप आणि कोण कोणाची आई याचा अंदाज तुम्ही आम्ही लावू शकत नाही. फक्त बारकी पोरं जिच्या पुढे पुढे चाललेले असतात ती आई आणि तो मुलगा असावा अशी आपल्याला खात्री पटते. परंतु अशा आईच्या मागे कोणीही प्रपोजल घेऊन जात नाही. किंवा तिला प्रपोज करेल म्हणून कोणताही नवरा तिला संशयाने बघत नाही. ज्याचं त्याचं आयुष्य जो तो जगत असतो. म्हणूनच हे संमेलन फार सुंदर ठरतं. या संमेलनात भांडण नसतं, तंटा नसतो, घटस्फोट नसतात किंवा खोटारडेपणा सुद्धा नसतो. यात वधू वर आपले जोडीदार शोधून सहजीवनाला निघून गेलेले असतात, त्यानंतर आयुष्य ते छान एकत्र जगतात. पुढे मूल होईपर्यंतची जबाबदारी मादीची असते. आणि मुलं झाल्यानंतर त्या अंड्यांची राखण करणं, ती अंडी उबवणं हे काम नर पेंग्वीन करत असतो. त्याच्यासाठी लागणारं अन्न गोळा करण्याचं काम मादी करत असते. म्हणजेच कोणतेही काम कमी नाही आणि कोणतेही मोठं नाही हे सांगणारं ह्यांचं सहजीवन खरं म्हणजे आमच्यासारख्या माणसाला काहीतरी शिकवून जाणारं आहे. यातला एखादा जरी गुण माणसाने घेतला तर खूप बरं होईल असं वाटतं. परंतु शिकण्याचं नाटक करणारा माणूस प्रत्येक क्षणाला नवीन चूक करत निघालेला असतो. त्याच्यामुळे या सगळ्या आदर्श कथा जागच्या जागीच राहतात.

Advertisement
Advertisement
Tags :

.