आईवडिलांवर नाराज, मुलीचे देवाला पत्र
आता उत्तरही आले
इंग्लंडच्या समरसेटमध्ये 8 वर्षीय मुलीने स्वत:च्या आईवडिलांकडे श्वानाचे पिल्लू पाळण्यासाठी अनुमती मागितली, परंतु तिच्या आईवडिलांनी नकार दिला. यामुळे ही मुलगी नाराज झाली. रागात या मुलीने देवालाच पत्र लिहिले. ही बाब काही मोठी नव्हती, परंतु 6 महिन्यांनी पोस्टाने तिच्या पत्राला उत्तर आल्यावर तिचे आईवडिल अवाक् झाले. या पत्रात मुलगी श्वान दत्तक घेऊ शकते असे नमूद होते. देवाकडून आलेले उत्तर वाचून मुलगी आनंदी झाली, परंतु हे पत्र अखेर कुणी पाठविले असा प्रश्न तिच्या आईवडिलांना पडला आहे.
हे पत्र अखेर कुणी लिहिले, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. परंतु यामागील रहस्य अत्यंत आनंददायी असून पत्राचे उत्तर मिळणे नेहमीच चांगले असते, या मुलीच्या आईने म्हटले आहे. मुलीने लिहिलेले पत्र आणि त्याच्या रहस्यमय उत्तराला मुलीच्या आईवडिलांनी रेडिटवर शेअर केले असून याच्या पॅप्शनदाखल ‘माझ्या मुलीकडून देवाला लिहिण्यात आलेल्या पत्राला उत्तर कुणी दिले’ असे नमूद करण्यात आले.
श्वानासाठी हट्ट
माझी 8 वर्षांची मुलगी श्वानांवर प्रेम करणारी आहे, आमच्याकडे पूर्वीच एक श्वान आहे, परंतु ती वारंवार रेस्क्यू सेंटरमधून आणखी एक श्वान आणण्याची मागणी करत होती. आम्ही आणखी एक श्वान आणण्यास नकार दिला. यामुळे नाराज होत ती स्वत:च्या बेडरुममध्ये गेली आणि एक तासानंतर एक लिफाफा घेऊन बाहेर पडल्याचे तिच्या आईवडिलांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
नकार दिल्यावर देवाला लिहिले पत्र
मुलीने लिफाफा लेटरबॉक्समध्ये टाकला, 6 महिन्यांनी मुलीच्या नावाने एक टाइप केलेले पत्र आले, जे एक प्रीपेड रॉयल मेल लिफाफ्यात होते. यावर वापसीचा पत्ता नव्हता तसेच डाकचा स्टॅम्पही नव्हता. नाव आणि पत्ता हाताने लिहिला होता. हे पत्र मिळाल्यावर आम्ही काही वेळ गोंधळात पडलो होतो, तर आमच्या मुलीने देवाला पत्र लिहून स्वत:चे श्वान दत्तक घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते का, अशी विचारणा केल्याची जाणीव आम्हाला झाल्याचे पोस्टमध्ये नमूद आहे.
माफ करा, उत्तर लिहिण्यास खूप वेळ लागला, ईश्वर प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि योग्यवेळी त्याचे उत्तर देतो. मुलीने प्राण्यांवरील प्रेम कायम ठेवावे आणि ती श्वान अवश्य दत्तक घेऊ शकते, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. उत्तर आयर्लंडमध्ये एक विशेष विभाग आहे, जो अशाप्रकारच्या पत्रांना हाताळतो आणि तेथे काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने या मुलीची निराशा दूर करण्यासाठी हे पत्र लिहिले असावे, असे मानले जात आहे.