For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ-उद्यमबाग मुख्य रस्ता अंधारात

10:07 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ उद्यमबाग मुख्य रस्ता अंधारात
Advertisement

पथदीप सुरू करण्याची वाहनचालक-नागरिकांची मागणी

Advertisement

बेळगाव : अनगोळ-उद्यमबाग केएलई इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील मुख्य रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात आहे. अनगोळ चौथ्या रेल्वेगेटपासून बेम्को नाक्यापर्यंत बसविण्यात आलेले पथदीप गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असल्याने या संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना सायंकाळनंतर जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुटला आहे. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी चाकरमानी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पूर्व-पश्चिम भागातील लोकांची या रस्त्यावरून वर्दळ असते. सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. येथे कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. हॉटेल्स् असल्याने विद्यार्थी जेवणासाठी जातात. त्यांना सर्वांनाच अंधाराचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रखर दिव्यांच्या उजेडामध्ये दुचाकीस्वार, सायकलस्वार व कारचालक वाट काढताना दिसतात. अंधारामुळे गतिरोधकांचाही अंदाज येत नाही. दरम्यान, हॉटेल आणि इतर व्यावसायिक रस्त्याच्या बाजूलाच आपली वाहने उभी करत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना रस्त्याच्या मधूनच जावे लागते. पावसाने झोडपण्यापूर्वीच घरी जाण्याच्या घाईमध्ये वाहने वेगाने चालविल्याने कदाचित या ठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय उद्यमबाग परिसरात मोठ्या संख्येने महिला कामाला जातात. त्यांना अंधारातूनच जावे लागते. रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आला असला तरी त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी झाडेझुडूपे उगवली आहेत. शिवाय काहींनी तेथे व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे एकूणच या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना अतिशय त्रास होत असून महानगरपालिकेने याची नोंद घ्यावी व येथील पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.