शास्त्रीनगर परिसरात अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे संताप
आरोग्याच्या समस्येमुळे पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर
बेळगाव : शास्त्रीनगर परिसरात मागील महिन्याभरापासून गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे परिसरात गॅस्ट्रो तसेच तापाचे रुग्ण वाढले आहेत. काळ्या रंगाचे पाणी पिण्यासाठी सोडले जात असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. आठवड्यातून एकदा शास्त्रीनगर परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणी तोंडात घेणेही अवघड होत आहे. या ऐवजी परिसरातील विहिरीचे पाणी योग्य आहे. अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे परिसरातील अनेकांना उलटी, जुलाब, ताप असे आजार जडले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
वेळीच शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन
काही वर्षांपूर्वी या परिसरात अशी समस्या उद्भवली होती. त्यावेळी सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे दिसून आले होते. यावेळीही असाच काहीसा प्रकार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच कोरोनामुळे खबरदारीची सूचना केली जात असताना अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वेळीच शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.