महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

क्रोध माणसाच्या पतनाला कारणीभूत होतो

06:30 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा राजाला म्हणतात, तुझ्या स्वत:च्याने विषयांवर नियंत्रण साधणार नाही. कितीही प्रयत्न केलास तरी तुला विषयोपभोगांचे आकर्षण वाटणार आणि ते तुला मोहात पाडणार. हे टाळण्यासाठी सदैव माझं स्मरण करून मला चित्तात साठवून ठेव. असं केलंस की, त्यात काय आनंद आहे ते तुला कळेल. विषयोपभोगांपासून मिळणाऱ्या क्षणिक आनंदापेक्षा हा चिरकाल टिकणारा आनंद लाखमोलाचा असतो. एकदा तुला ह्या आनंदाची चटक लागली की, समोर दिसणाऱ्या किंवा अतिशय कष्ट करून मिळवलेल्या वस्तूतील आनंद फारच किरकोळ वाटेल. त्या वस्तूबद्दल इंद्रियांनी तुला कितीही मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्या मिळवण्याची तुला इच्छाही होणार नाही. त्यातून इंद्रियांनी काय दाखवायचे आणि काय नाही हे तू ठरवू शकशील. म्हणजेच इंद्रियांवर तुझा ताबा राहील आणि तू जितेंद्रिय होशील. अशाप्रकारे इंद्रियनियंत्रण साधलेल्या साधकाला कृतबुद्धि किंवा स्थिरबुद्धि असे म्हणतात. कृतबुद्धि शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. बाप्पानी सांगितलेलं ऐकून, त्यांच्याठिकाणी मन गुंतवायचा सल्ला बुद्धी देत असते. जो बुद्धीने सांगितल्याप्रमाणे करतो अशा मनुष्याला कृतबुद्धि म्हणतात. जो कृतबुद्धि असतो त्याची बुद्धी स्थिर असते. म्हणून बाप्पा त्याला स्थिरबुद्धि असंही म्हणतायत.

Advertisement

जो बाप्पांनी सांगितलेल्या उपदेशाबरहुकूम वागत नाही तो मनुष्य सदैव असमाधानी असतो. कारण त्याच्या इच्छा, वासना त्याच्यावर राज्य करत असतात. त्यामुळे त्याला राग चटकन येतो आणि त्याचं अध:पतन व्हायला सुरुवात होते. सदैव विषयांचं चिंतन करणाऱ्याला विषयात आसक्ति उत्पन्न होते. तीपासून काम उत्पन्न होतो. त्यापासून क्रोध वृद्धि पावतो. ज्ञानेन्द्राrयांनी दाखवलेले विषय आपल्याला उपभोगायला कसे मिळतील याचे त्याच्या मनात कायम चिंतन चालू असते. बरं, एखादी गोष्ट मिळाली की, त्यातून पुढील इच्छेचा जन्म होतो. सामान्यत: मनुष्याला आपला देह हीच त्याची खरी ओळख आहे असे वाटत असते. आपला देह कायम सुखात असावा आणि ते सुख विषयांच्या उपभोगातून मिळेल असे तो समजत असतो. त्यातूनच एक इच्छा तृप्त झाली की त्यातून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो. ह्या इच्छा करण्याला अंत म्हणून नसतो.

त्यामुळे इच्छा व त्यांच्या पूर्तीसाठी धडपड हे चक्र सतत चालू असतं. त्यामुळे मनुष्य कायम अतृप्त असतो. काहीतरी करून इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. इच्छा एकदा पूर्ण झाल्यावर त्या वारंवार पूर्ण व्हाव्यात असं वाटू लागून त्याचा लोभ सुटतो. आहे ते असुद्यात व आणखीही मिळुद्यात अशी वासनापूर्तीच्या हव्यासाची मन:स्थिती तयार होते. आपल्या इच्छापूर्तीच्या, वासनेच्या आड कुणी येतंय असं दिसलं की, त्याचा राग येतो. अगदी आपल्या मताविरुद्ध कुणी बोललेलंसुद्धा खपत नाही. सगळ्यांनी आपला आदर करावा, मानसन्मान द्यावा, आपलं ऐकावं, आपलं बरोबर आहे असं म्हणावं आणि त्यानुसार वागावं अशी इच्छा प्रबळ होते. त्याला कुणी विरोध केला की, माणसाला राग येतो. कारण त्याला स्वत:विषयी आसक्ती निर्माण झालेली असते. सखोल विचार केला तर लक्षात येईल की, काम, मोह, ममता यातून आपल्याला सुखोपभोग मिळावेत ही स्वार्थी वृत्ती जोपासली जाते पण क्रोधातून दुसऱ्याला दुखवावं, दुसऱ्याचं वाईट करावं, त्याला त्रास द्यावा असं वाटू लागतं. हा क्रोध माणसाच्या अध:पतनाला कारणीभूत होतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

क्रोधादज्ञानसंभूतिर्विभ्रमस्तु तत स्मृते ।

भ्रंशात्स्मृतेर्मतेर्ध्वंसस्तद्ध्वंसात्सो पि नश्यति ।।60।।

अर्थ- क्रोधापासून अज्ञानाची उत्पत्ती होते, त्यापासून स्मृतिविभ्रम होतो, स्मृतीभ्रंशापासून बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे मनुष्य नाश पावतो.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article