शहर परिसरात अंगारकी भक्तिभावाने
गणेश मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन : मंदिरांच्या आवारात दिवसभर भाविकांची गर्दी : एखाद्या उत्सवाप्रमाणे अंगारकी संकष्टी साजरी
बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी अंगारकी भक्तिभावाने साजरी झाली. विविध गणेश मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्यात अंगारकी आल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महिलांसह पुरुषांनीही अंगारकीचा उपवास केला. उपवासाच्या निमित्ताने फळफळावळे, सुका मेवा, साबुदाणे यांची खरेदी अधिक प्रमाणात झाली. राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिर, हिंडलगा गणपती मंदिर, सिद्धिविनायक मंदिर टिळकवाडी, सिद्धविनायक मंदिर शहापूर, गणपत गल्लीतील मंदिर आदी स्थळांवर अंगारकीनिमित्त विशेष पूजा झाली. मंदिरांतून महाभिषेक, महापूजा, आरती, चंद्रोदयानंतर महाआरती असे कार्यक्रम झाले. शास्त्राrनगर गणेश मंदिरात श्रींना अभिषेक, पुष्पालंकार, सत्यविनायक पूजा व रात्री महाआरती असे कार्यक्रम झाले.
अनेक मंदिर स्थळांवर भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. मंदिरांच्या आवारात दिवसभर भाविकांची गर्दी दिसून आली. श्रावण मासानिमित्त विविध व्रत-वैकल्ये सुरू आहेत. त्यातच अंगारकी योग आल्याने भाविकांनी गणेशाचे व्रत भक्तिभावाने केले. दर्शनासाठी मंदिर आवारात सायंकाळी अधिक गर्दी होती. हिंडलगा येथील गणपती मंदिरासमोर मंगळवारी पहाटे साडेचारपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. अंगारकीनिमित्त मागील दोन दिवसांपासून गणेश मंदिरात तयारी सुरू होती. मंदिराची साफसफाई करून फुले व विद्युत दीपांची आरास करून मंदिर सजविण्यात आले होते. एकूणच अंगारकी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी झाली.
कपिलेश्वर मंदिरात अथर्वशीर्ष पठण-गणहोम
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये अथर्वशीर्ष पठण, गणहोम असे कार्यक्रम झाले. मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते अभिषेक व आरती झाली. त्यानंतर गणहोमला सुरुवात झाली. गणहोमचे पौरोहित्य वासुदेव छत्रे गुरुजी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर महाआरती, प्रसाद वाटप झाले. यावेळी अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, अजित जाधव, प्रथमेश कावळे, महेश सांबरेकर, अभी पवार, संजय मणगुतकर, अनिल मुतकेकर, दौलत जाधव, विनायक मणगुतकर, जोतिबा कावळे, रोशन नाईक आदी उपस्थित होते.