For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाड्यांमुळे 40 लाखांपेक्षा अधिक जणांला लाभ

10:49 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाड्यांमुळे 40 लाखांपेक्षा अधिक जणांला लाभ
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या : बेंगळुरात ‘आयसीडीए’चा सुवर्ण महोत्सव : अक्का पथकला चालना, 5 हजार अंगणवाडी केंद्रांत एलकेजी-युकेजी

Advertisement

बेंगळूर : समग्र शिशू विकास योजना (आयसीडीएस) ही माता-बालमृत्यू आणि कुपोषणाची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेली दूरदर्शी योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यभरात सुरू असणाऱ्या 69,922 अंगणवाडी केंद्रांमुळे 40 लाखापेक्षा जास्त महिला व मुलांना फायदा झाला आहे. राज्यातील 5,000 अंगणवाडी केंद्रांमध्ये एलकेजी व युकेजीचे वर्ग सुरू केले जात आहेत. भविष्यात इतर केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर शुक्रवारी महिला आणि बालकल्याण खात्याच्यावतीने अंगणवाड्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला सुरक्षेसाठी राबविलेल्या अक्का पथक, गृहलक्ष्मी बहुद्देशीय सहकारी संस्था आणि राज्यातील 5 हजार अंगणवाड्यांमध्ये एलकेजी-युकेजीचे वर्ग सुरू करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला.

Advertisement

इंदिरा गांधी यांनी दूरदृष्टीकोन बाळगून सुरू केलेल्या समग्र शिशू विकास योजनेने 2 ऑक्टोबर 2025 रोजी मैलाचा दगड पार केला. ज्या काळात माता-बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते तेव्हा इंदिरा गांधींनी आयसीडीएस हा कार्यक्रम राबविला. कर्नाटकातील टी. नरसीपूर तालुक्यातील होसहळ्ळी गावात पहिले अंगणवाडी केंद्र सुरू झाले. आज राज्यात 69,922 केंद्रे कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे शिवकुमारांनी केले गुणगाण

अंगणवाडी कर्मचारी या लहान मुलांच्या दुसऱ्या माता आहेत. त्या मुलांना मार्गदर्शन करून देशाचे भविष्य घडवतात. ज्ञानदेवता असणाऱ्या सरस्वतीचे स्थान म्हणजे अंगणवाडी, अशा शब्दात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. घर हेच मुलाची पहिली शाळा आणि आई ही पहिली गुरु असते. अंगणवाडी सेविका स्वत:च्या मुलांना वेळ न देता इतरांच्या मुलांच्या भविष्यासाठी दिलेली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडतात, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाला माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा, मंत्री एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खंडे, के. एच. मुनियप्पा, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आमदार असिफ सेठ, बाबसाहेब पाटील, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी व विविध अधिकारी आदी उपस्थित होते.

आयसीडीएसच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आणखी सुधारणा!

इंदिरा गांधी यांनी गरीब मुलांनाही श्रीमंतांच्या मुलांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने समग्र शिशू विकास योजना (आयसीडीएस) सुरू केली. या योजनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यात आणखी सुधारणा केल्या आहेत. गृहलक्ष्मी योजनेतील पुढील भाग म्हणून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी गृहलक्ष्मी बहुद्देशीय सहकार संघ सुरू केले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अक्का पथक स्थापन केले आहे. अंगणवाड्यांत एलकेजी-युकेजीचे वर्ग सुरू केले जात आहेत.

- लक्ष्मी हेब्बाळकर, महिला व बालकल्याणमंत्री

Advertisement
Tags :

.