दोन दिवसांत अंगणवाडी सेविकांचे वेतन मिळणार
महिला-बाल कल्याण खात्याच्या सहसंचालकांचे आश्वासन : सहसंचालकांची घेतली भेट
बेळगाव : मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे वेतन थकल्याने मंगळवारी अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनतर्फे महिला व बाल कल्याण खात्याचे सहसंचालक नागराज आर. यांची भेट घेण्यात आली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांचे वेतन येत्या एक-दोन दिवसात जमा होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. याबाबत खात्याकडे कित्येकवेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. सेविकांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवही वेतनाविना काढावा लागला आहे. जिल्ह्यात 5656 अंगणवाडी केंद्रे आहेत.
अलिकडे यामध्ये नवीन लहानमोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. मात्र सर्वच अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे वेतन थांबले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनतर्फे मंगळवारी महिला व बालकल्याण खात्याच्या सहसंचालकांची भेट घेण्यात आली. दरम्यान, त्यांनी लवकर वेतन अदा केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र वेतन कधी मिळेल याची चिंता अंगणवाडी सेविकांना कायम आहे. ऐन सणासुदीच्या काळातच अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे वेतन थकल्याने त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. अंगणवाडी सेविकांवर आहार, गणती, कुपोषण, मतदार नोंदणी, महिलांना सकस आहाराचे वितरण यासह इतर कामांची जबाबदारी दिली जाते. मात्र त्यांना वेतनाविना रहावे लागले आहे.
सीडीपीओंची तातडीने बदली करा
शहर विभागातील सीडीपीओंची तातडीने बदली करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान, मंत्री हेब्बाळकर यांनी सहसंचालकांना चौकशी करून तातडीने कळवावे. असा आदेश दिला होता. मात्र अद्याप महिला व बालकल्याण खात्याच्या सहसंचालकांनी मंत्री हेब्बाळकरांना याबाबत काहीच कळविले नाही. तातडीने या सीडीपीओंची बदली न झाल्यास अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.