For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

11:16 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समस्या सोडविण्याचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : सरकारी प्राथमिक शाळेत एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करू नयेत, या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर सुरू केलेले बेमुदत आंदोलन महिला व बाल कल्याणच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. सरकारी शाळांमध्ये एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्याचा आदेश रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी संघटना (सीटू) यांच्या नेतृत्वाखाली फ्रिडम पार्कवर बेमुदत आंदोलन सुरू होते. अखेर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शिवाय अंगणवाडी केंद्र आणि सेविकांच्या अस्तित्वाला कोठेही धक्का पोहोचणार नाही.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे.शिक्षण खात्याकडून सरकारी शाळेमध्ये एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, या विरोधात राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलन हाती घेतले आहे. शिवाय हा आदेश रद्द करण्याची मागणीदेखील लावून धरली आहे. आंदोलनस्थळी दाखल होऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगणवाडी केंद्रामध्येच पूर्वप्राथमिकचे वर्ग सुरू करण्याविषयी येत्या दोन दिवसांत शिक्षणमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांना कोणताही त्रास होणार नाही, असा निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बैठक

बेंगळूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवार दि. 24 जून रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. गुरुवारी बळ्ळारी जिल्ह्याच्या तोरणगल्ल येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी याविषयी माहिती दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपासंबंधी दोन्ही खात्यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याची सूचना केली असून सोमवारी यासंबंधी बैठक बोलावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.