जिनिव्हा स्पर्धेत अँडी मरेचे पुनरागमन
वृत्तसंस्था /जिनिव्हा
एटीपी टूरवरील येथे या महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू 36 वर्षीय अँडी मरेचे पुनरागमन होणार आहे. मध्यंतरी मरेच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बरेच दिवस टेनिसपासून अलिप्त राहावे लागले होते. 18 मे पासून जिनिव्हा टेनिस स्पर्धेला येथे प्रारंभ होत असून सदर स्पर्धा क्ले कोर्टवर खेळवली जात आहे. स्पर्धा आयोजकांनी अँडी मरेला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत खेळताना त्याच्या डाव्या पायाचा घोटा मुरगळला होता. 2018 साली अँडी मरेच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मरेने आतापर्यंत दोनवेळा विम्बल्डन ग्रँडस्लॅम जेतेपद तसेच ऑलिम्पिकचे सुवर्णपदकही मिळवले आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत तो पुन्हा ब्रिटनचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी उत्सूक आहे.